भारतात क्रिकेटची क्रेझ किती आहे, हे कुणापासूनच लपून राहिलेलं नाही. भारतात क्रिकेट स्टेडियमची संख्याही खूप जास्त आहे. दरम्यान, आता हैदराबादमध्ये आणखी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे, ज्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली.
हैदराबादमध्ये आधीपासूनच एक क्रिकेट स्टेडियम आहे, जे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम या नावानं ओळखलं जाते. या स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यांपासून ते आंतरराष्ट्रीय सामनेही खेळवले जातात. तेलंगणा सरकारला आता आणखी एक स्टेडियम बांधून आपल्या राज्यातील पायाभूत क्रीडा सुविधांना चालना द्यायची आहे, जेणेकरून भविष्यात क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळू शकेल. तेलंगणा सरकार तरुणांना खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करू इच्छित आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी विधानसभेत खेळावर चर्चा करताना स्टेडियम बांधण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की हे नवीन स्टेडियम बेगरीकाचा येथील कौशल युनिव्हर्सिटीजवळ बांधलं जाईल. या प्रकल्पासाठी बीसीसीआयशी याआधीच प्राथमिक चर्चा झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तेलंगणा सरकारनं यंदा विधानसभेत खेळांसाठी 321 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या नव्या स्टेडियमसाठी सरकारनं जमीनही देऊ केली आहे. याशिवाय तेलंगणा सरकार आपल्या खेळाडूंचा सन्मान आणि समर्थन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या विजेत्या संघाचा एक भाग असलेल्या हैदराबादच्या मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून बक्षीस मिळणार आहे. सिराजला गट 1 स्तरावरील सरकारी नोकरी मिळेल. सिराज बारावी उत्तीर्ण आहे. अशा परिस्थितीत सिराजनं पोलिस खात्यात काम करण्यास सहमती दर्शवल्यास त्याला थेट डीएसपी पदावर नियुक्ती दिली जाईल.
सिराजशिवाय दोन वेळची विश्वविजेती बॉक्सर निखत जरीनलाही गट 1 स्तरावरील सरकारी नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय या दोन्ही खेळाडूंना सरकारकडून घरंही मिळणार आहेत.
हेही वाचा –
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?
मेगा लिलावापूर्वी हार्दिकचा पत्ता कट! मुंबई इंडियन्स रोहित-सूर्यकुमारसह या 4 खेळाडूंना कायम ठेवणार
अवघ्या 4 सामन्यात गौतम गंभीरनं केली माजी प्रशिक्षकाच्या रेकाॅर्डची बरोबरी