पुणे । महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, देविका घोरपडे यांच्यासह पाच खेळाडूंनी मुष्टीयुद्धात अंतिम फेरी गाठली आणि सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या. महाराष्ट्राने १७ व २१ वर्षालील मुले व मुली या चार गटांत मिळून २१ पदके निश्चित केली आहेत.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुलांच्या १७ वर्षालील गटात आकाश याने ५७ किलो वजनी विभागाच्या उपांत्य फेरीत हरयाणाच्या अमन दुहान याच्यावर ५-० असा सफाईदार विजय मिळविला. आकाश याने सुरुवातीपासून या लढतीवर नियंत्रण राखले होते. तो पुण्यातील नेहरू स्टेडियम येथे एमआयजी संस्थेत उमेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तो सर परशुरामभाऊ महाविद्याालयात अकरावी कला शाखेत शिकत आहे. त्याने गतवर्षी शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णवेध घेतला होता. त्याचबरोबर त्याने सर्बियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. त्याचे वडील रखवालदार म्हणून काम करतात.
याच वयोगटात महाराष्ट्राच्या शेखोमसिंग याने अंतिम फेरीत स्थान मिळविताना हरयाणाच्या विकासकुमार याच्यावर ५-० असा दणदणीत विजय नोंदविला. ५४ किलो विभागात बिश्वाामित्र चोंगोमथोम याने उपांत्य लढतीत मणीपूरच्या नईमेरकाप्मसिंग याचा ५-० असा पराभव केला. शेखोमसिंग व बिश्वाामित्र हे दोघेही आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युटमध्ये सराव करतात. ५४ किलो गटात महाराष्ट्राच्या येईपाबा मोईती यानेही अंतिम फेरीकडे वाटचाल केली. त्याने पंजाबच्या अविनाश जंगवाल याचे आव्हान संपुष्टात आणले.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटाच्या ४६ किलो विभागात देविका हिने विजयी घोडदौड राखताना हरयाणाच्या रिंकूकुमारी हिचा पराभव केला. चुरशीने झालेली ही लढत देविका हिने ३-२ अशी जिंकली. ती पुण्यात आॅलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलींच्याच ४८ किलो गटात मात्र लक्ष्मी पाटील हिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत तिला मणीपूरच्या टिंगमिला दिंगमिला हिने ५-० असे पराभूत केले.
लक्ष्मीचे पहिलेच पदक
लक्ष्मी पाटील ही नंदूरबार येथील आबाजी स्पोटर््स अकादमीत राकेश माळी यांच्याकडे प्रशिक्षण घेत असून खेलो इंडिया महोत्सवातील तिचे हे पहिलेच पदक आहे. गतवर्षी तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. तिचे वडील नंदूरबार येथे हमालाचे काम करतात. मुष्टीयुद्धाच्या करिअरसाठी तिला दरमहा साधारणपणे ५ ते ६ हजार रुपये खर्च येत असून हा सर्व खर्च आबाजी अकादमीतर्फे केला जात आहे. तिचे मामा मयूर ठाकरे हे माजी राष्ट्रीय अॅथलेट असून त्यांच्या प्रेरणेमुळेच तिने मुष्टीयुद्धाचा सराव सुरू केला.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना
–टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ