नागपूर। रणजी ट्रॉफीमध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू आहेत. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात पाच विकेट्स गमावत 486 धावांचा डोंगर उभा केला आहे.
या डावात वसीम जाफरने 26 चौकाराच्या मदतीने 206 धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने आत्तापर्यंत 9 वेळा दोनशेचा आकडा पार करण्याचाही पराक्रम केला आहे. यामध्ये मुंबईकडून खेळताना त्याने 4 वेळा, इंडिया ए कडून एक वेळा, भारताकडून 2 वेळा आणि विदर्भाकडून खेळताना 2 वेळा 200 धावांचा आकडा पार केला आहे.
मुंबईकडून खेळताना त्याने दोन वेळा 300 धावांचाही आकडा पार केला आहे. जाफरने कालच्या शतकी खेळीचे आज द्विशतकी खेळीमध्ये रूपांतर केले. हे त्याचे प्रथम श्रेणीतील 57वे शतक होते. 206 धावा करण्यासाठी त्याने 296 चेंडूचा सामना केला आहे.
रणजीच्या या हंगामात त्याने 86च्या सरासरीने 969 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे. तर मागील तीन डावामध्ये त्याने 98, 178 आणि 126 धावा करत अप्रतिम खेळ केला आहे.
याच महिन्यात जाफर सर्वाधिक रणजी सामने खेळणारा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर त्याने 251 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 19 हजार धावांचा टप्पाही पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना
–टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ