भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. तो आता आयपीएल 2024 द्वारे पुनरागमन करेल. या हंगामात हार्दिक मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आलंय.
हार्दिक पांड्याला 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळताना दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आता या अष्टपैलू खेळाडूनं दुखापत झाल्यानंतर विश्वचषक न खेळल्याची व्यथा मांडली.
हार्दिक पांड्या म्हणाला, “बांगलादेशविरुद्ध दुखापत झाल्यानंतर मी संघ व्यवस्थापनाला सांगितलं की, मी 5 दिवसांनी परतेन. यानंतर मी माझ्या घोट्यावर 3 इंजेक्शन्स घेतली. मी माझ्या घोट्यातून रक्त काढून टाकलं. मी माझं सर्व काही दिलं, परंतु मी खेळू शकलो नाही. मला स्वतःहून चालता येत नव्हतं. मी सतत वेदनाशामक औषध घेत होतो.”
स्टार अष्टपैलू खेळाडूनं पुढे सांगितले की, “दुखापतीनंतर 10 दिवस मी पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहिलो, पण तंदुरुस्त होऊ शकलो नाही. माझ्या देशासाठी खेळणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण मी फिट होऊ शकलो नाही.”
आयपीएलच्या या हंगामामध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हार्दिकची जुनी टीम गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. 24 मार्च रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जाईल.
हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये आपल्या पहिल्या हंगामातच विजेतेपद पटकावलं होतं. तर 2023 आयपीएलमध्ये ते उपविजेते राहिले होते. आता आगामी आयपीएलसाठी संघानं युवा फलंदाज शुबमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. शुबमन प्रथमच कुठल्याही आयपीएल टीमचं नेतृत्व करेल. गुजरातच्या संघात केन विल्यमसन, राशिद खान, वृद्धिमान साहा, डेव्हिड मिलर, उमेश यादव, मोहित शर्मा अशा अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकदिवसीय आणि टी20 चे असे दिग्गज भारतीय फलंदाज जे कसोटीमध्ये फ्लॉप ठरले
देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’