सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे दु:ख पचवू शकणार नसल्याचे वक्तव्य काही दिग्गजांनी केले. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांनीही कसोटी मालिकेत भारताचे दमदार पुनरागमन करणे अशक्य असल्याचे सांगितले होते. आता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हेडिन यांनीही भारतीय संघाविषयी वक्तव्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना झाला होता. या सामन्यात पहिल्या डावाअखेर आघाडीवर असलेल्या भारतीय संघावर लज्जास्पद पराभवाची नामुष्की ओढवली होती. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड यांनी मिळून फक्त ३६ धावांवर भारताचा दुसरा डाव गुंडाळला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने सामना जिंकत मालिकेत १-०ने आघाडी मिळवली.
भारतीय संघाचे मालिकेत पुनरागमन करणे अशक्य
एका मुलाखतीत याविषयी बोलताना हेडिन म्हणाले की, “मला नाही वाटत भारतीय संघ या पराभवाच्या धक्क्यातून सावरू शकेल. माझ्या मते, चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत केवळ ऍडलेड येथील सामना जिंकण्याची भारताकडे संधी होती. पुढील सामन्यात भारताचे गोलंदाज चांगले प्रदर्शन करतील आणि कदाचित फलंदाजही मोठ्या आकडी धावा करतील. तरीही त्याचे मालिकेत पुनरागमन करणे खूप अवघड असल्याचे दिसत आहे.”
“भारताला उर्वरित ३ कसोटी सामन्यातील शेवटचा सामना ब्रिसबेनच्या मैदानावर खेळायचा आहे. या मैदानावर मोठमोठे संघही ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकले नाहीत. या सामन्याव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांच्या खेळपट्टीची भारतीय संघाला थोडीफार मदत होऊ शकते. पण भारतीय क्रिकेटपटूंना या संधीचे सोने करता येणार नाही,” असे पुढे बोलताना हेडिन म्हणाले.
एवढेच नव्हे, तर हेडिन यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचीही चर्चा केली. अनुभवी वेगवान इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येऊ शकला नाही, तर पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही मालिकतून बाहेर झाला आहे. याविषयी बोलताना हेडिन म्हणाले की, “मागील मालिकेत भारतीय संघाचे गोलंदाजी आक्रमक मजबूत होते. पण यावेळी इशांत संघाचा भाग नाही. तसेच शमीही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारताच्या समस्या वाढल्या आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘ …तर भारतीय संघाला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळू शकतो’, गावसकरांचा इशारा
भल्या भल्यांना न जमणाऱ्या स्टाईलने करतो ‘हा’ खेळाडू फलंदाजी; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
कर्णधारपद नको रे बाबा…! पूर्णवेळ कसोटी कॅप्टन बनण्यास दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूचा नकार