---Advertisement---

“धोनीवर १५ टक्के रक्कम खर्च करणे म्हणजे नुकसानच”; दिग्गजाची सीएसकेवर टीका

On: शनिवार, नोव्हेंबर 27, 2021 8:32 PM
---Advertisement---

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी आता पुढील वर्षी चेन्नईसाठी खेळताना दिसेल. धोनीसोबत अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनाही चेन्नईने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने त्यांचा कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रॅड हॉगने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच्या बाबतीत सीएसकेने व्यावसायिक विचार करायला हवा, असे हॉगने म्हटले आहे.

चेन्नईने धोनीबद्दल भावनिक विचार करू नये, असे मत हॉगचे आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान त्याने म्हटले की, “एमएस धोनीला किती दिवस खेळायचे आहे? जर तो आणखी एक वर्ष खेळला, तर त्याला निवडणे योग्य होणार नाही. मी त्याला लिलावात जाऊ देईन आणि तिथून त्याला पुन्हा विकत घेईन. हे कठीण आहे पण व्यवसायात असेच होते. फक्त एक वर्ष खेळणार असलेल्या खेळाडूवर तुम्हाला १५ टक्के खर्च करायचा आहे का?”

चेन्नईने कोणते चार खेळाडू कायम ठेवले पाहिजेत हेही हॉगने सांगितले आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि फाफ डू प्लेसिस यांना कायम ठेवावे, असे त्याने म्हटले आहे.

आयपीएल मेगा लिलावापूर्वी खेळाडू कायम ठेवण्याच्या यादीची अंतिम मुदत संपत आली आहे. याच कारणाने सर्व फ्रँचायझी त्यांच्या संबंधित खेळाडूंची यादी जाहीर करत आहेत. चेन्नईबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार एमएस धोनीला कायम ठेवण्याच्या बातम्या समोर येत आहेत. एका वृत्तानुसार, चेन्नईने धोनीसोबत ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा यांना रिटेन केले आहे. मोईन अलीलाही रिटेन केले जाण्याची चर्चा आहे. जर तो रिटेन होण्यासाठी राजी झाला नाही तर, सॅम करनला रिटेन करण्यात येईल.

दिल्ली कॅपिटल्सने आपले चार खेळाडू रिटेन करणे निश्चित केले आहे. दिल्लीने कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा संघ परदेशी खेळाडू एन्रिक नॉर्किएला कायम ठेवणार आहेत. मोठी बातमी म्हणजे पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल फ्रँचायझी सोडणार आहे. त्याला लखनौच्या नवीन फ्रँचायझीचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---