रशिया। फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यात ब्राझिलने मेक्सिकोला २-० ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
याबरोबरच ब्राझिलने आतापर्यंतच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करून नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. ब्राझिलने 108 सामन्यात एकूण 228 गोल केले आहेत.
याआधी हा विक्रम जर्मनीच्या नावावर होता. त्यांनी 109 सामन्यात 226 गोल केले आहेत. तसेच यामध्ये इटली 83 सामन्यात 128 गोल करुन तिसऱ्या स्थानावर आहे.
ब्राझिलने या 108 सामन्यांपैकी 73 सामन्यांत विजय मिळवला आहे आणि 17 सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर 18 सामने अनिर्णीत राहिले. 73 सामने जिंकणाराही तो पहिलाच देश आहे.
रशियात सुरू असणारा हा 21वा फिफा विश्वचषक असून ब्राझिलचाही 21वा फिफा विश्वचषक आहे. तसेच ब्राझिल हा असा एकच संघ आहे ज्याने पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला आहे.
फिफा विश्वचषकातील ब्राझिलचा हा मेक्सिको विरूद्धचा पाचवा विजय होता. त्यांनी मेक्सिको विरूद्ध 41पैकी 24 सामने जिंकले आहेत.
मेक्सिको विरूद्धचा सामना जिंकून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे ब्राझिल सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.
गतविजेता जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, पोर्तुगल हे संघ या स्पर्धेतून बाहेर झाल्याने ब्राझिलला हा विश्वचषक जिंकण्याची चांगलीच संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: मेस्सी चाहत्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच
–पोर्तूगालचा संघ मायदेशी पोहचला, ख्रिस्तियाने रोनाल्डो मात्र गायब








