आयपीएलच्या 12 व्या मोसमाचा लिलाव मंगळवारी(18 डिसेंबर) जयपूर, राजस्थान येथे पार पडला. या लिलावात प्रत्येक संघाने युवा खेळाडूंना पसंती दिल्याने अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणीही बोली लावली नाही.
यामध्ये ब्रेंडन मॅक्यूलमचाही समावेश आहे. मॅक्यूलम पहिल्या मोसमापासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकता नाइट रायडर्सकडून खेळताना 158 धावांनी आक्रमक खेळी केली होती. या खेळीमुळे आयपीएलला धमाकेदार सुरुवात झाली होती.
मात्र यावेळी मॅक्यूलमला कोणत्याच संघाने संघात घेतलेले नाही. याबद्दल रेडीओ स्पोर्टशी बोलताना मॅक्यूलमने तो नजीकच्या काळात क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता असल्याचे सुचवले आहे.
मॅक्यूलम म्हणाला, ‘काहीवेळेस अशा गोष्टी घडतात. मी नशीबवान आहे की मी आयपीएलमध्ये 11 मोसम खेळलो. तूम्हाला एका टप्प्यावर खेळापासून दूर जाणे गरजेचे असते.’
तसेच तो पुढे म्हणाला, ‘चांगल्या गोष्टींचा नेहमी शेवट असतो आणि मला आनंद आहे की न्यूझीलंडच्या काही खेळाडूंवर संघानी बोली लावली आहे. मी जास्त काळजी करत नाही. अशाप्रकारे खेळ काहीवेळेस पुढे जातो. मी बाकी खेळाडूंना शुभेच्छा देतो. भविष्यात काय घडेल हे आपल्याला कधीही कळत नाही.’
न्यूझीलंडचा माजी कर्णधार मॅक्यूलमने याआधीच 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
37 वर्षीय मॅक्यूलमने आयपीएलमध्ये 109 सामन्यात 27.70 च्या सरासरीने 2881 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…
–धोनीने रणजी ट्रॉफी खेळणे म्हणजे युवा खेळाडूची संधी हुकणे!
–भारताचे माजी सलामीवीर फलंदाज झाले भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक