रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यात बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाचा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत केले होते. या दोन्ही सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने महत्वाची भूमिका बजावली होती. आता माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने मॅक्सवेलबद्दल भाष्य केले आहे.
मॅक्सवेलने पहिल्या सामन्यात ३९ धावांची खेळी केली होती; तर दुसऱ्या सामन्यात त्याने ५९ धावा केल्या होत्या. मॅक्सवेलचे हे प्रदर्शन पाहून माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली म्हणाला, “बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत खेळल्यामुळे मॅक्सवेलच्या फलंदाजीवर सकारात्मक परिणाम होत आहे. तो कोहलीसोबत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची शैली शिकत आहे. या हंगामात बेंगलोर संघात प्रवेश केल्यानंतर त्याच्या फलंदाजीमध्ये खूप सुधारणा झाली आहे. पहिल्या दोन सामन्यात असेच दिसून आले आहे. त्याने कोहलीसोबत मैदानावर चांगला वेळ घालवला आहे. मला वाटत आहे की, कोहली त्याची ताकद बनून उभरून येत आहे. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “कोहलीच्या उपस्थितीमुळे मॅक्सवेलच्या एकाग्रतेत वाढ झाली आहे. तो आधीसारखी गडबड करताना दिसून येत नाहीये. याच्यावरून स्पष्ट होत आहे की, कोहली त्याच्यासाठी एक चांगला सहयोगी बनला आहे .त्याने पहिल्या २ सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.”
आयपीएलमध्ये ३ वर्षानंतर झळकावले अर्धशतक
सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात, बेंगलोर संघ अडचणीत असताना मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात विराट कोहलीने ३३ धावा केल्या होत्या. तसेच देवदत्त पडीक्कलने ११ धावा केल्या होत्या. एबी डिविलियर्स देखील १ धाव करत माघारी परतला होता. अशा कठीण परिस्थितीत मॅक्सवेलने अर्धशतक झळकावले होते. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला १४९ धावा करण्यात यश आले होते. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने ६ धावांनी आपल्या नावावर केला होता.ग्लेन मॅक्सवेलचे हे आयपीएल कारकिर्दीतील ७ वे अर्धशतक होते. तसेच हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याला ३ वर्ष वाट पाहावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ६ फूट ८ इंच उंचीच्या गोलंदाजाला कॅप्टन कोहलीचे ‘हे’ गुण करायचे आहेत अवगत
दिनेश कार्तिकचा मोठा खुलासा, ‘या’ कारणामुळे गतवर्षी अर्ध्यातच सोडले होते केकेआरचे कर्णधारपद