प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे. अनेकांना हे स्वप्न पूर्ण करण्यात अपयश येते तर काही क्रिकेटपटू हे स्वप्न पूर्ण करून आपल्या देशाचे नाव उंचावतात. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याचे देखील इंग्लंड संघासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरले होते. परंतु पदार्पणाच्या सामन्यात चांगली कामगिरी करून सुद्धा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले आहे.
यामागचे कारण असे की त्याने ८ वर्षांपूर्वी एक वादग्रस्त ट्विट केले होते. ऑली रॉबिन्सनला निलंबित केल्यानंतर ब्रिटनचे क्रीडामंत्री ओलिवर डाउडेन यांनी देखील या प्रकरणात हस्तक्षेप करत रॉबिन्सनला समर्थन दर्शवले आहे.
ऑली रॉबिन्सनला निलंबित करताच क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांनी ऑली रॉबिन्सनला समर्थन दर्शवले. इसीबीने घेतलेल्या निर्णयावर ब्रिटनचे क्रीडामंत्री ओलिवर डाउडेन यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “ऑली रॉबिन्सनने केलेले ट्विट चुकीचे होते. परंतु ही एक दशकपूर्वीची गोष्ट आहे आणि ते ट्विटही एका लहान मुलाने लिहिले होते. तोच लहान मुलगा आज एक पुरुष झाला आहे. त्याने आपली चुक मान्यदेखील केली आहे. इसीबीने त्याला निलंबित करून खूप कठोर निर्णय घेतला आहे. त्यांनी या गोष्टीवर पुन्हा एकदा विचार करायला हवा.”
Ollie Robinson’s tweets were offensive and wrong.
They are also a decade old and written by a teenager. The teenager is now a man and has rightly apologised. The ECB has gone over the top by suspending him and should think again.
— Oliver Dowden (@OliverDowden) June 7, 2021
त्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत प्रवक्त्याने सोमवारी (७ जून) डोडेन यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देत म्हटले की, “जसं की, डोडेनने म्हटले की, या गोष्टी एक दशकपूर्वीच्या आहेत. त्यावेळी तो लहान होता. त्यासाठी त्याने माफी देखील मागितली.”
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. तसेच रॉबिन्सनसाठी हा आपल्या कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना ठरला आहे. रॉबिन्सनने या सामन्यात ७ गडी बाद केले होते. यासोबतच ४२ धावांची खेळी देखील केली होती. सामना झाल्यानंतर त्याने २०१२ मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे माफी देखील मागितली होती. तरीही त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निलंबित केले गेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बस्स… आता चर्चा थांबवा; पंत-साहामध्ये ‘हा’ यष्टीरक्षक विरुसारखा बिनधास्त, तोच सध्या सर्वोत्कृष्ट
इंग्लंडच्या भूमीत विलियम्सन सपशेल फ्लॉप, फलंदाजी सरासरीत अगदी भारतीय गोलंदाजानेही टाकलंय मागे
क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! कर्णधार अन् सलामीवीराची जोडी करतेय कसून सराव