---Advertisement---

पंचांच्या खराब कामगिरीवर संतापले स्टोक्स-ब्रॉड, म्हणाले…

On: रविवार, जानेवारी 31, 2021 7:27 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील सर्वोत्कृष्ट टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगमध्ये जगभरातील अनेक नामांकित क्रिकेटपटू खेळत असतात. परंतु, स्पर्धेच्या चालू हंगामात पंचांची पातळी इतकी खाली आली आहे, हे स्पष्ट दिसत आहे. या हंगामात पंचांनी अत्यंत खराब निर्णय घेतले आहेत. तसेच डीआरएसचा वापर स्पर्धेत केला जात नाही. पंचांच्या चुकीच्या निर्णयांमुळे अटीतटीच्या सामन्यांत मोठा फरक पडताना दिसत आहे.

शनिवारी (३० जानेवारी) बिग बॅश लीगच्या क्वालिफायरमध्ये असेच काहीसे घडले. पर्थ स्कॉर्चर्सला सिडनी सिक्सर्सविरुद्ध ९ गडी राखून पराभव पत्करावा लागला आणि ते स्पर्धेमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत. पर्थचा कर्णधार मिचेल मार्शला खराब पंचगिरीचा फटका बसला आणि पर्थला सामना गमवावा लागला. त्या निर्णयाविरोधात मार्शसोबत अनेक क्रिकेटपटूंनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

मिचेल मार्श झाला चुकीच्या निर्णयाचा शिकार

पर्थ स्कॉर्चर्सच्या फलंदाजी दरम्यान मिचेल मार्श क्रीजवर होता. डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकीफने तेराव्या षटकातील पाचवा चेंडू वाईड स्वरूपाचा टाकला. चेंडू मार्शच्या अत्यंत जवळून गेला असल्याने, गोलंदाज व यष्टीरक्षकाने जोरदार अपील केले. पंचनीही घाईत त्याला बाद दिले. पंचांच्या निर्णयाने मिशेल मार्श स्तब्ध झाला. तो नाराजी व्यक्त करत पव्हेलियनकडे चालू लागला. मिशेल मार्शला पर्थचा मॅचविनर मानले जाते. परंतु, पंचांच्या चुकीमुळे त्याला केवळ २ धावा करता आल्या. परिणामी, त्याचा संघ २० षटकांत १६७ धावा करण्यास सक्षम झाला आणि सामना ९ गड्यांनी हरला.

बेन स्टोक्स व स्टुअर्ट ब्रॉडने दिली प्रतिक्रिया

मिचेल मार्श चुकीच्या निर्णयाचा बळी ठरल्यानंतर इंग्लडचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स व अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्टोक्सने ट्विट करत म्हटले की, ”चुकीच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी डीआरएसचा वापर केला जातो. इतक्या प्रतिष्ठित स्पर्धेत त्याचा वापर का केला जात नाही? आपल्याकडे सोपे पर्याय असताना अशा प्रकारचे निर्णय पाहून निराश व्हायला होते.”

स्टोक्सपाठोपाठ इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही याच मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया मांडली. ट्वीट करत त्याने म्हटले की, ”तो काय वेडा आहे का? आपल्या सर्वोत्तम खेळाडूला अशा पद्धतीने बाद होताना पाहून दुःख होते. डीआरएस आणि टीव्ही रिप्लेची सोय असताना ते वापरले का जात नाही?”

पर्थ स्कॉर्चर्सला पहावे लागले पराभवाचे तोंड

बीबीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पर्थ स्कॉर्चर्सला सिडनी सिक्सर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. पर्थने दिलेले १६८ धावांचे आव्हान जेम्स व्हिन्सच्या तुफानी ९८ धावांच्या खेळीमुळे सिक्सर्सने तीन षटके बाकी असताना आरामात गाठून अंतिम फेरीत प्रवेश केला. पर्थ ४ फेब्रुवारी रोजी चॅलेंजर सामन्यात ब्रिस्बेन हिट व सिडनी थंडर्स यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढेल.

महत्वाच्या बातम्या:

PAK vs SA : दिग्गज खेळाडूंना वगळत नवोदितांना संधी, टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

जो रुट व्यतिरिक्त इंग्लंडचे हे ४ खेळाडू देखील ठरू शकतात भारतीय संघासाठी डोकेदुखी

इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीसाठी टीम इंडियात निवड झालेले ३ महाराष्ट्रीयन खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---