आज बॅडमिंटनची जागतिक क्रमवारी जाहीर झाली आहे. या क्रमवारीत स्टार भारतीय बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत, एच एस प्रणॉय, सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू हे आपल्या स्थानी कायम आहेत. तसेच साई प्रणितची क्रमवारी सुधारली आहे. तर सौरभ वर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.
पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय हे आपल्या अनुक्रमे २ आणि ११ व्या स्थानी कायम आहेत. अजय जयरामही २२ व्या स्थानी कायम आहे. महिला एकेरीत पी व्ही सिंधु दुसऱ्या तर सायना नेहवाल ११ व्या स्थानी कायम आहे.
या वर्षीचा सिंगापूर सुपर सिरीज ओपन स्पर्धेचा विजेता साई प्रणितला आज जाहीर झालेल्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा होऊन तो आता १५ व्या स्थानी आला आहे. त्याच्या कारकिर्दीतील जागतिक क्रमवारीत १४वे स्थान त्याचे सर्वोत्तम आहे. त्याने ते जुन महिन्यात मिळवले होते.
त्याचबरोबर गतवर्षीच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा विजेता सौरभ वर्माची १६ स्थानांची घसरण होऊन तो आता ५७ व्या स्थानी आला आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते.
त्याला सप्टेंबर महिन्यात जपान ओपन सुपर सिरीज नंतर हैद्राबादमध्ये प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही मोठी स्पर्धा खेळलेला नाही. तसेच त्याचा भाऊ समीर वर्मा याचीही २ स्थानांनी घसरण होऊन तो २० व्या स्थानी आला आहे.
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने २७ वे स्थान मिळवले आहे. ही त्यांची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. तसेच मनू अत्री आणि सुमीत रेड्डी ३३ व्या स्थानी आहेत.
महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी २५ व्या स्थानी कायम आहेत. मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांची जोडीही १६ व्या स्थानी कायम आहे.