माजी भारतीय क्रिकेटपटू चिंगलपुट दोराईराज गोपीनाथ (सी.डी. गोपीनाथ) यांचे वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले. 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध देशाचा पहिला-वहिला कसोटी विजय मिळवून देणाऱ्या भारतीय संघातील ते हयात असलेले शेवटचे खेळाडू होते. आपल्या खेळाडू कारकिर्दीनंतरही, त्यांनी निवड समिती सदस्य आणि व्यवस्थापक म्हणून संघाची सेवा करणे सुरूच ठेवले. सी.डी. गोपीनाथ यांनी चेन्नईतील अड्यार येथील आपल्या मुलीच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
सी.डी. गोपीनाथ यांनी 1951-52 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी 50 नाबाद आणि 42 धावांची खेळी केली होती. त्यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1960 मध्ये खेळला. नऊ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 8 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 242 धावा केल्या आणि 1 बळी मिळवला. याव्यतिरिक्त, त्यांनी 83 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 4259 धावा केल्या, ज्यात 9 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 14 बळीही मिळवले होते.
चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात गोपीनाथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी 35 धावांची खेळी केली होती. विनू मांकड यांच्या गोलंदाजीवर ब्रायन स्टॅथम यांना बाद करण्यासाठी एक निर्णायक झेल टिपला होता. त्या सामन्यात, मांकड यांनी पहिल्या डावात ८ आणि दुसऱ्या डावात ४ बळी मिळवले होते.
बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी सी.डी. गोपीनाथ यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘X’ वर लिहिताना त्यांनी म्हटले: “श्री. सी.डी. गोपीनाथ हे अशा एका युगाचे प्रतिनिधित्व करत होते, जेव्हा भारतीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात करत होते. त्यांनी केवळ भारतीय संघासाठीच योगदान दिले नाही, तर मद्रास संघाच्या सुरुवातीच्या यशातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवड समितीचे अध्यक्ष आणि संघ व्यवस्थापक म्हणून त्यांनी या खेळाशी कायम ठेवलेला संबंध, क्रिकेटप्रती त्यांची असलेली नितांत भक्ती दर्शवतो. त्यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना व प्रियजनांना आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.”
आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ‘X’ लिहिले, “भावपूर्ण श्रद्धांजली, सी.डी. गोपीनाथ! भारतीय क्रिकेटचे एक खरे आद्यप्रवर्तक आणि भारताच्या पहिल्या कसोटी विजयाची गाथा रचणाऱ्या त्या ऐतिहासिक संघाचे अखेरचे हयात सदस्य. तुमचा वारसा या खेळाच्या समृद्ध इतिहासात सदैव कोरलेला राहील.”






