भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची व फिरोज शहा कोटला मैदानाची खेळपट्टी उखडल्याची घटना सर्वांना ज्ञात आहे. दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाले असताना भारत-पाकिस्तान सामना होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी या दोन्ही मैदानावरील खेळपट्टी उखडून टाकली होती. मात्र, यापूर्वीच खेळपट्टी खराब करण्याची एक घटना इंग्लंडच्या हेडिंग्ले मैदानावर झाली होती आणि ती देखील प्रतिष्ठेच्या ऍशेज मालिकेदरम्यान.
१९७५ ची ऍशेस इंग्लंडमध्ये होत होती. बर्मिंघम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली. लॉर्ड्सवरील दुसर्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४८४ धावांचा पाठलाग करताना ३२९-३ धावा करून सामना अनिर्णित सोडवला. तिसरा सामना हेडिंग्लेच्या लीड्स मैदानावर होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकत फलंदाजी करताना समाधानकारक सुरुवात केली.
डेव्हिड स्टील (७३), जॉन एड्रिच (६२) आणि कर्णधार टोनी ग्रेग (५१) यांनी अर्धशतके झळकावून इंग्लंडला पहिल्या दिवशी २५१-५ पर्यंत मजल मारून दिली. पण, दुसऱ्या दिवशी गॅरी गिल्मोरच्या ६ बळींमुळे इंग्लंडचा डाव २८८ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलिया फलंदाजीला उतरल्यानंतर, इंग्लंडच्या फिल एडमंड्स यांच्या गोलंदाजीसमोर त्यांची वाताहत झाली. एडमंड्स यांच्या पाच बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ १३४ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने दुसऱ्या डावात, डेव्हिड स्टील यांच्या ९२ व टोनी ग्रेग यांच्या ४९ धावांच्या जोरावर २९१ धावा उभारल्या.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ४४५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवल्यामुळे यजमानांना मालिका बरोबरीत आणण्याची संधी होती. पण, ऑस्ट्रेलिया सहजासहजी हार मानणार संघ नव्हता. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २२०-३ अशी दिसत होती. सलामीवीर रिक मॅककोस्करने नाबाद ९५ तर कर्णधार इयान चॅपल ६२ धावांवर नाबाद होते. अखेरच्या दिवशी, मालिका बरोबरीत आणण्यासाठी यजमानांना सात बळींची तर ऍशेस आपल्याकडे राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २२५ धावांची गरज होती.
अखेरच्या दिवशी सकाळी, ग्राऊंड्समन जॉर्ज कॅथ्रे यांनी खेळपट्टीवरील ताडपत्री काढली तर ते आवाक झाले. कारण, खेळपट्टीवर ठिकठिकाणी लहान लहान खड्डे करून त्यात तेल भरण्यात आले होते. कॅथ्रे यांनी खेळपट्टी दुरुस्त करण्याचे अनेक पर्याय तपासून पाहिले मात्र त्यांना अपयश आले. दोन्ही संघांच्या कर्णधारांना तातडीने खेळपट्टी बघण्यासाठी बोलविले गेले. टोनी ग्रेग व इयान चॅपल यांनी खेळपट्टी पाहून सामना न खेळण्याचे ठरवले. शेजारच्या खेळपट्टीवर सामना पूर्ण करण्याची कल्पनाही दोघांनी धुडकावून लावले. सामना अनिर्णित घोषित केला गेला. दुर्दैवाने, रिक मॅककोस्करचे पहिले शतक पूर्ण होऊ शकले नाही.
रात्रीच्यावेळी पहारेदारी करणाऱ्या चौकीदाराकडे चौकशी केली असता त्याने, आपण कोणताही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले. शेवटी, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली गेली. त्या रात्रीच, हेडिंग्ले शहरातील अनेक भिंतीवर “जॉर्ज डेव्हिस इज इनोसेंट” अशा प्रकारच्या घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. पोलिसांनी लवकरच तपास लावला की, जॉर्ज डेव्हिसच्या समर्थकांनी मैदानावरील खेळपट्टी खराब केली होती.
कोण होता जॉर्ज डेव्हिस ?
मार्च १९७५ मध्ये जॉर्ज डेव्हिस याला २० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी बराच काळ आंदोलन केले होते. इसेक्स येथील लंडन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (एलईबी) कार्यालयात सशस्त्र दरोड्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आले होते. डेव्हिस हा लंडनमधील टॅक्सीचालक होता. बऱ्याच लोकांना तो निर्दोष वाटत. त्याच्या समर्थनार्थ “जॉर्ज डेव्हिस इज इनोसेंट” नावाची मोहीम देखील इंग्लंडमध्ये राबविली गेली होती.