भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याने स्वत: या बाबतची घोषणा केली होती. कर्णधार म्हणून आपला अखेरचा टी२० विश्वचषक खेळणाऱ्या विराटचे या विश्वचषकात दणदणीत कामगिरी करण्याचे लक्ष असेल. फलंदाजीतील अनेक विक्रम नावावर असलेला विराट या विश्वचषकात एक अशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, जी कामगिरी त्याला ११ वर्षांपासून करता आली नाही.
युएईत कोहलीचे विराट लक्ष
हा टी२० विश्वचषक युएईच्या ज्या मैदानांवर खेळविण्यात येत आहे. तेथे विराटला मागील दोन आयपीएल हंगाम खेळण्याचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर तो गेली ११ वर्ष न करू शकलेली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. ती कामगिरी म्हणजे आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावणे. आयपीएलमध्ये ६ शतके नावावर असलेल्या विराटची आंतरराष्ट्रीय टी२० शतकांची पाटी कोरीच आहे.
विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीचा श्रीगणेशा २०१० मध्ये केला होता. तेव्हापासून आजपर्यंत त्याने ९० टी२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर ३१५९ धावा असून, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. असे असले तरी, त्याला आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावता आले नाही.
सर्वाधिक अर्धशतके विराटच्याच नावे
विराटला आंतरराष्ट्रीय टी२० शतक ठोकता आले नसले तरी, सर्वाधिक २८ अर्धशतके त्याच्याच बॅटमधून आली आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्याच रोहित शर्माच्या नावावर २२ अर्धशतके आहेत. या विश्वचषकात एक यादगार शतक ठोकत आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ संपवण्याची संधी विराटकडे असेल. विश्वचषकातील भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी २४ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये पार पडेल.
महत्त्वाच्या बातम्या –
असंही होऊ शकत! नेदरलँड्सच्या पाच फलंदाजांनी भोपळा न फोडल्याने घडला मोठा इतिहास
टी२० विश्वचषकात आयर्लंडच्या क्रिकेटपटूने घडवला इतिहास! ४ चेंडूत घेतल्या सलग ४ विकेट्स