Aiden Markram Statement । रविवारी (दि. 17 डिसेंबर) जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडिअम येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान संघाला भारताकडून 8 विकेट्स आणि 200 चेंडूंनी पराभव पत्करावा लागला. यामुळे यजमान संघ मालिकेत 0-1ने पिछाडीवर पडला. या सामन्यात यजमानांकडून दोन्ही विभागात खराब प्रदर्शन पाहायला मिळाले. या पराभवानंतर कर्णधार एडेन मार्करम याने मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला मार्करम?
या पराभवानंतर कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) नाखुश दिसला. तो म्हणाला की, “कठीण सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आम्हाला चांगली फलंदाजी करायची होती. भारतीय गोलंदाजांना याचे श्रेय जाते. आम्ही पहिल्या चेंडूपासूनच पिछाडीवर होतो. गोष्टी व्यवस्थित घडल्या नाहीत. आम्ही सुरुवातीला मदतीची आशा बाळगली होती. साधारणत: इथे पहिल्या 6-7 षटकात मदत मिळते. आम्ही यापूर्वीही असे पाहिले आहे. मात्र, आज हे काही वेळ सुरू राहिले आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. जेव्हा आक्रमक फलंदाजीचा विषय निघतो, तेव्हा वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून आहे की, त्यांनी आकलन करावे आणि पुढील योजना बनवावी. आम्हाला कोणत्याही स्थितीत स्मार्ट पर्याय अवलंबण्याची गरज आहे.”
नाणेफेक गमावत केली फलंदाजी
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. यावेळी त्यांनी 27.3 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 116 धावा केल्या. हे आव्हान भारताने फक्त 16.4 षटकात 2 विकेट्स गमावत पार केले.
यजमानांच्या फलंदाजांची घसरगुंडी
पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने खूपच खराब सुरुवात केली. त्यांनी पहिल्या 10 षटकात 4 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. त्यामुळे संघ सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यातून सावरू शकला नाही. तसेच, 27.3 षटकातच 116 धावांवर गुडघे टेकले. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून अष्टपैलू अँडिले फेहलुक्वायो याने 49 चेंडूत सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तसेच, त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर टोनी डी झोर्झी याने 22 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले.
यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग याने कहर केला. त्याने 10 षटकात 37 धावा खर्चत सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, आवेश खानने 4, तर कुलदीप यादवनेही 1 विकेट नावावर केली. आता 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या वनडेत यजमान संघ पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल. (captain aiden markram statement after losing vs india in first odi match)
हेही वाचा-
SAvsIND: पहिल्याच वनडेत आफ्रिकेची धूळधाण उडवल्यानंतर कर्णधार राहुलचे लक्षवेधी भाष्य; म्हणाला…
IPL 2023 । सचिनने मुंबई इंडियन्सची साथ सोडली? समोर आली महत्वाची माहिती