आशिया चषक 2022मधील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळला जाणार आहे. उभय संघांची आशिया चषकातील आमने सामने आकडेवारी पाहता, भारतीय संघाचे पारडे जड आहे. परंतु पाकिस्तानचा संघ पुनरागमन करत टी20 विश्वचषक 2021 प्रमाणे आशिया चषकाचीही विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. या ब्लॉकब्लास्टर सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने भारतीय संघाला चेतावणी दिली आहे.
भारताशी दोन हात (India vs Pakistan) करण्यापूर्वी आझमने (Babar Azam) पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान त्याने म्हटले की, पाकिस्तानचा संघ मोठमोठ्या गोष्टी बोलण्यावर विश्वास ठेवत नसून मैदानावर प्रत्यक्षात गोष्टी करून दाखवतो.
पत्रकार परिषदेत आझम म्हणाला की, “मला माहिती आहे, दोन्ही देशांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी जबरदस्त उत्साह आहे. परंतु आमच्यासाठी हा फक्त एक सामना आहे. आमची खूप चांगली तयारी सुरू आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही आत्मविश्वासाने मैदानावर उतरू. 11 महिन्यांपूर्वी याच दुबईच्या मैदानावर आम्ही भारतावर अविस्मरणीय असा विजय मिळवला होता, जी आपल्यासाठी एक सकारात्मक बाब असेल. याच विचारासह आम्ही मैदानात उतरू.”
“मला वाटते की, पाकिस्तानकडून खेळण्यासाठी आणि चांगले प्रदर्शन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या अतिरिक्त प्रेरणेची गरज नसते. आपल्या देशाचे विश्वस्तरावर प्रतिनिधित्त्व करणे ही एक आपल्यातच सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट आहे“, असेही आझमने म्हटले.
भारताचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड
दरम्यान आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ 14 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 1997 साली झालेला एकच सामना अनिर्णीत राहिला होता. उर्वरित 13 सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानचा संघ फक्त 5 सामने जिंकू शकला आहे. अशात आता आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानपैकी कोणता संघ दमदार प्रदर्शन करतो? हे पाहणे रोमांचक ठरेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वो वर्ल्ड कप याद करो..’, भारताला पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी कर्णधार आझमचे संघाला मोटिवेशन
‘थोडा तो सिक्रेट रखने दो यार’, कॅप्टन रोहितने पत्रकाराचीच घेतली फिरकी, पण प्रश्न काय होता?
पाकिस्तान सावधान! ‘महामुकाबल्या’पूर्वी रोहितची ताकद दुप्पट, बडा दिग्गज भारतीय संघात सामील