महिला आशिया चषक 2022मधील उपांत्य सामना गुरुवारी (दि. 13 ऑक्टोबर) भारत विरुद्ध थायलंड संघात पार पडला. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने थायलंडवर 74 धावांनी विजय मिळवला. यानंतर आता भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीतने 36 धावांची दुसरी सर्वोच्च खेळी केली. दुखापतीमुळे हरमनप्रीतला पहिले दोन सामने खेळता आले नव्हते. या खेळीमुळे तिचा आत्मविश्वास परतल्याचे तिने सांगितले आहे.
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली की, “आमच्या (जेमिमाह रोड्रिग्जसोबतची) भागीदारीमुळे आम्ही चांगली धावसंख्या उभी करू शकलो. जेव्हा तुम्ही खूप जास्त खेळत नसता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी धावांची आवश्यकता असते. आता माझ्या खेळाबद्दल माझा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, मी यावर काम करत राहील. संघासाठी योगदान दिल्यानंतर नेहमीच चांगले वाटते.”
https://twitter.com/BCCIWomen/status/1580437748518821888
“आम्ही चांगली फलंदाजी केली. थायलंडच्या गोलंदाजांविरुद्ध चांगले प्रदर्शन केले आणि धावा कुटणे सोपे नव्हते. आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. धावफलकावर 150च्या आसपास धावा असतील, तर आत्मविश्वास वाढतो,” असे पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली. 7 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर करणाऱ्या फिरकीपटू दिप्ती शर्मा हिची प्रशंसा करताना ती म्हणाली की, “ती कोणत्याही क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असते. असे गोलंदाज संघात असणे चांगले असते.”
अंतिम सामन्याबद्दल बोलताना हरमनप्रीत म्हणाली की, “अंतिम सामन्यासाठी आम्ही तयार आहोत. समोर जो संघ असेल, त्यानुसार रणनीती बनवून आम्ही खेळू.” भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं, तर ते महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात तब्बल आठव्यांदा पोहोचले आहेत. आता भारतीय संघ आशिया चषकातील अंतिम सामन्यात शनिवारी (दि. 15 ऑक्टोबर) श्रीलंकेविरुद्ध भिडेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय चाललंय! ऑस्ट्रेलियात दुसऱ्या सराव सामन्यातही रिषभ पंत फेल, टी20 विश्वचषकातून होणार हाकालपट्टी?
VIDEO | वॉर्नरच्या डोक्याला झाली असती गंभीर दुखापत, सुदैवाने थोडक्यात निभावलं






