भारतीय संघ रविवारी (5 नोव्हेंबर) वनडे विश्वचषकात कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सुरुवात केली. कर्णधार रोहितने आक्रमक 40 धावांची खेळी करत तंबूचा रस्ता धरला. त्यामुळे अनेक जण रोहितने या विश्वचषकात अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे म्हणत आहेत. मात्र, आकडेवारी काही वेगळेच बोलताना दिसत आहे.
रोहितने या सामन्यात फक्त 24 चेंडूंचा सामना करताना 40 धावांची महत्त्वाची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहित बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 5.5 षटकात 1 बाद 62 इतकी होती.
रोहितची या विश्वचषकात सुरुवात अत्यंत खराब झाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खातेही न खोलता तंबूत परतला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 133 धावांची वादळी खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध त्याच्या बॅटमधून 63 चेंडू मध्ये 86 धावांची खेळी आलेली. बांगलादेशविरुद्ध देखील त्याच्या बॅटमधून 40 चेंडू 48 धावा आल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध देखील त्याने 46 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिलेली. इंग्लंड विरुद्ध इतर फलंदाजांनी संघर्ष केला असताना त्याने 101 चेंडूंमध्ये 87 धावा जमा केल्या होत्या.
रोहित या विश्वचषकात पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसला आहे. त्याने प्रत्येक सामन्यात फटकेबाजी करत संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतर फलंदाज आपला वेळ घेऊन संघासाठी मोठे योगदान देताना दिसत आहेत. यासोबतच तो आपल्या नेतृत्वाने देखील सर्वांना प्रभावित करतोय.
(Captain Rohit Sharma Gives Fine Starts For India In 2023 ODI World Cup)
हेही वाचा-
फखर जमानच्या झंझावाती शतकाने पीसीबी अध्यक्ष खूश, केलं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस जाहीर
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट