Suryakumar Yadav Statement: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने तब्बल 106 धावांनी खिशात घातला. या विजयासह भारताने प्रतिष्ठित मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता, पण तो दमदार प्रदर्शन करण्यात यशस्वी झाला. विजयानंतर सूर्यकुमारने मोठे भाष्य केले.
अखेरच्या सामन्यात मिळालेल्या विजयाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळाला. सामन्यानंतर त्याने भाष्य करत म्हटले की, “सामना जिंकणे नेहमीच सुखद असते. संघाच्या विजयात जर आपल्या बॅटमधून शतक आले, तर हा आनंद द्विगुणित होतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आमचा विचार आहे की, कोणत्याही भीतीशिवाय आक्रमक क्रिकेट खेळले पाहिजे. सामन्यापूर्वी आम्ही योजना बनवली होती की, प्रथम फलंदाजी करत आपल्याला एक चांगली धावसंख्या उभी करायची आहे. तसेच, त्यानंतर त्याचा यशस्वी बचावही करायचा आहे.”
यावेळी सूर्याने कुलदीप यादव याचे कौतुकही केले. तो म्हणाला, “या सामन्यासाठी सहकाऱ्यांनी कठोर मेहनत घेतली होती आणि मैदानात ते दिसलेही. कुलदीप यादवमध्ये नेहमीच विकेट घेण्याची भूक असते. आपल्या वाढदिवशी त्याने जबरदस्त प्रदर्शन करत स्वत:ला एक खास गिफ्ट दिले आहे.”
आपल्या दुखापतीविषयी बोलताना तो म्हणाला की, तो ठीक आहे आणि लवकरच पूर्णपणे जुनी फिटनेस मिळवेल. तो म्हणाला, “जर मी चालू शकत आहे, तर याचा अर्थ असा आहे की, मी ठीक आहे.”
सूर्या सामनावीर
तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 201 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाला 13.5 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 95 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून सूर्यकुमार यादव याने 56 चेंडूंचा सामना करताना 100 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील चौथे शतक मारले. त्याच्या शतकात 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले. विशेष म्हणजे, या मालिकेत 2 सामने खेळताना सूर्याने 78च्या सरासरीने सर्वाधिक 156 धावा केल्या. यासाठी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (captain suryakumar yadav statement after india won 3rd t20 against south africa said this)
हेही वाचा-
जोहान्सबर्गमध्ये कुलदीपने दाखवली जादू! विकेट्सचे पंचक घेत भारताला मिळवून दिला विजय
टी20 जिनियस सूर्यकुमार! अवघ्या 56 चेंडूत ठोकलं शतक, दक्षिण आफ्रिकेपुढे 200+ धावांचे आव्हान