टेनिस मधील सर्वात प्रतिष्ठित विम्बल्डन 2024 चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. या सामन्यात 21 वर्षीय स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्कारेजनं तुफानी कामगिरी करून इतिहास रचला आहे. त्यानं अंतिम सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2, 7-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. अल्कारेजचं हे दुसरं विम्बल्डनं जेतेपद आहे. त्यानं 2023 मध्ये अंतिम सामन्यात जोकोविचचाच पराभव करून आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं.
अल्कारेज आणि जोकोविच यांच्यातील हा जेतेपदाचा सामना 2 तास 27 मिनिटे चालला. अल्कारेजनं सुरुवातीपासूनच सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. पहिले दोन सेट त्याने जिंकले होते. यानंतर जोकोविचने तिस-या सेटमध्ये थोडाफार संघर्ष केला, पण त्याला सेट जिंकता आला नाही.
तिसरा सेट अतिशय रोमांचक राहिला, ज्यामध्ये अल्कारेज 5-4 ने आघाडीवर होता. परंतु जोकोविचनं शानदार पुनरागमन केलं. त्यानं हा सेट 6-6 असा बरोबरीत आणत टायब्रेकमध्ये नेला. पण इथे पुन्हा अल्कारेजनं शानदार प्रदर्शन केलं. टायब्रेकरमध्ये अल्कारेजनं 7-4 गुणांच्या फरकाने सेट जिंकला आणि तिसरा सेट 7-6 असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरलं.
37 वर्षीय जोकोविचनं अंतिम सामना जिंकला असता तर त्यानं इतिहासात स्वत:चं नाव कोरलं असतं. या विजयासह जोकोविचला टेनिस इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदं (पुरुष आणि महिला) जिंकणारा खेळाडू बनण्याची संधी होती. परंतु अल्कारेजनं त्याचं स्वप्न भंग केलं.
ऑस्ट्रेलियाची माजी महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्टनं 24 ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले आहेत. यापैकी तिची 13 विजेतेपद ओपन एरापूर्वी आली. टेनिसमधील खुल्या युगाची सुरुवात 1968 मध्ये झाली. जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हा 37वा ग्रँडस्लॅम एकेरी अंतिम सामना होता, जो ओपन युगातील कोणत्याही खेळाडूचा सर्वाधिक आहे. त्यानं या बाबतीत स्विस दिग्गज रॉजर फेडरर आणि स्पॅनिश स्टार राफेल नदालला खूप मागं टाकलं आहे.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम (महिला आणि पुरुष एकेरी)
(1) नोव्हाक जोकोविच (पुरुष-सर्बिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-10, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-4)
(2) मार्गारेट कोर्ट (महिला-ऑस्ट्रेलिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-11, फ्रेंच-5, विम्बल्डन-3, यूएस-5)
(3) सेरेना विल्यम्स (महिला-यूएसए)- 23 (ऑस्ट्रेलियन-7, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-6)
(4) राफेल नदाल (पुरुष- स्पेन) – 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बल्डन-2, यूएस-4)
(5) स्टेफी ग्राफ (महिला-जर्मनी)- 22 (ऑस्ट्रेलियन-4, फ्रेंच-6, विम्बल्डन-7, यूएस-5)
(6) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बल्डन-8, यूएस-5)
महत्त्वाच्या बातम्या –
युवा ब्रिगेडचा दरारा! शुबमन गिलच्या संघानं झिम्बाब्वेला नाचवलं, मालिका 4-1 ने खिशात
इतिहासातील सर्वात महागडा अंतिम सामना…12 लाखाचं एक तिकीट! सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत जाणून बसेल धक्का
ऑलिम्पिकमध्ये फक्त 5 रिंग का असतात? रिंगच्या रंगांचा अर्थ काय? सर्वकाही जाणून घ्या