वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (WIvENG) यांच्यात अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडने शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजसमोर २८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यजमान संघाला बाद करून सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ७१ षटके गोलंदाजी करायची होती. परंतु, एनक्रुमाह बोनर व जेसन होल्डर यांच्या चिवट फलंदाजीसमोर इंग्लंडच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. परिणामी, सामना अनिर्णित राहिला. मात्र, या सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार व अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट (Carlos Braithwaite) याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सामना राहिला अनिर्णीत
वेस्ट इंडीजसमोर दोन सत्रे व काही षटकांचा खेळ शिल्लक असताना २८६ धावांचे आव्हान होते. सलामीवीरांनी चांगली कामगिरी केल्यानंतरही वेस्ट इंडीजची अचानक घसरगुंडी झाली. अखेरचे सत्र शिल्लक असताना वेस्ट इंडीजचे सहा गडी बाद होणे शिल्लक होते. अशा परिस्थितीत खेळपट्टीवर काहीही घडत नसताना इंग्लंडचा कर्णधार जो रूटने अखेरपर्यंत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार व अनुभवी अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट चांगलाच संतापला. तो म्हणाला,
“मी सध्या वेस्ट इंडीज ड्रेसिंग रूमचा भाग असतो तर, मला अपमानित झाल्यासारखे वाटले असते. दोन खेळाडू खेळपट्टीवर उभे असताना आणि खेळपट्टीकडून काहीही मदत मिळत नसताना इंग्लंडला वाटत होते आपण सामना जिंकू. अंतिम षटक सुरू झाल्यानंतर त्यांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. हा ऍशेस मालिकेतील सामना असता तर त्यांनी तसे केले असते का? भारत, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्याविरुद्ध त्यांनी असा निर्णय घेतला असता का? यावर त्यांच्याकडे उत्तर नसेल. त्यांनी आमच्याविरूद्ध असा निर्णय का घेतला? वेस्ट इंडीज संघाला सिद्ध करण्यासाठी आणखी दोन सामने आहेत.”
उभय संघांमध्ये दुसरा सामना १६ मार्चपासून बार्बाडोस येथे सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या-
बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)