भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१२ मार्च) पार पडला. अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने ८ गड्यांनी शानदार विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात, भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून खेळणाऱ्या युजवेंद्र चहलने एक बळी मिळवत एक नवा विक्रम आपल्या नावे जमा केला.
चहलच्या नावे जमा झाला विक्रम
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख फिरकीपटू असलेल्या युजवेंद्र चहलने आजच्या सामन्यात एक बळी मिळवत एका खास विक्रमाला गवसणी घातली. चहलने इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर याला पायचीत करत आपल्या टी२० कारकिर्दीतील ६० वा बळी मिळवला. यासह भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा तो गोलंदाज बनला. त्याने वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराहला मागे सोडले.
आपला ४६ वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळताना चहलने हा विक्रम केला. यापूर्वी, तो बुमराहसह ५९ बळींसह संयुक्तपणे अव्वलस्थानी विराजमान होता. बुमराहने ५० टी२० सामन्यात ५९ बळी मिळवले आहे.
शंभर आंतरराष्ट्रीय सामने खेळला चहल
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात मैदानात उतरताच चहलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शंभरावा सामना खेळला. त्याने आत्तापर्यंत ५४ वनडे व ४६ टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये अनुक्रमे ९१ व ६० बळी आपल्या नावे केले आहेत. त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्याने केवळ १२४ धावा काढू शकला होता. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक ६७ धावा काढल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने ३ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, जेसन रॉय व जोस बटलर यांनी ७२ धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. रॉयने ४९ तर बटलरने २८ धावा बनविल्या. मलान व बेअरस्टो यांनी आणखी पडझड होऊ न देता इंग्लंडचा विजय साकारला. जोफ्रा आर्चरला सामनावीर घोषित करण्यात आले.
भारतासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
युजवेंद्र चहल- ६०
जसप्रीत बुमराह- ५९
रविचंद्रन आश्विन- ५२
भुवनेश्वर कुमार- ४१
कुलदीप यादव- ३९
महत्त्वाच्या बातम्या –
अकरा वर्षांनी रोहित शर्मानंतर भारतीय खेळाडूने केली ‘अशी’ कामगिरी, अय्यरच्या नावे खास विक्रमाची नोंद
दसहजारी मनसबदारांसाठी मार्च महिना आहे खास, जुळून आला ‘हा’ खास योगायोग
“हेल्मेट घालूनही तुम्ही शून्यावर बाद होऊ शकता, त्यामुळे…”, उत्तराखंड पोलिसांनी केले कोहलीला ट्रोल