– नचिकेत धारणकर
कोरोना मुळे लांबलेल्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने नुकतेच संपले. नेहमी दोन्ही संघांच्या घरच्या मैदानावर १-१ सामना खेळवला जाण्याची परंपरा असलेल्या चॅम्पियन्स लीगमध्ये यावर्षी केवळ १ च सामना खेळवला जाणार होता आणि त्यामुळे नक्कीच काही प्रमाणात उलटफेर होतील अशी सगळ्यांच्या मनात भीती होतीच आणि तसे झाले सुद्धा.
पहिला सामना ॲटलांटा विरुद्ध पीएसजी असा होता पण तो पूर्ण वेळ नेमार विरुद्ध ॲटलांटा असल्याचे जाणवत होते. एम्बाप्पेला दुखापतीमुळे पहिल्या ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले नाही आणि संघाची सर्व भिस्त नेमारवर आली. नेमारने सुरुवातीपासूनच अनेक संधी निर्माण केल्या पण त्याला त्याचे रूपांतर गोल मध्ये करता आले नाही. तब्बल १५ यशस्वी ड्रिबल करत त्याने चॅम्पियन्स लीगच्या एका सामन्यात मेस्सी (१६) नंतर सर्वाधिक ड्रिबलच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
ॲटलांटाने सामन्याच्या पूर्वार्धात २६ व्या मिनिटाला गोल करत सामन्यावर पकड मिळवली. सामन्यात १७ वेळा गोल मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीएसजीला पाहिले यश सामन्याच्या ९० व्या मिनिटाला आले जेव्हा नेमारच्या मदतीने मारकिन्होने गोल केला. सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच ९३ व्या मिनिटाला एरिक मोटींगने गोल करत पीएसजीला नाट्यमय विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच पीएसजीने १९९५ नंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. ९० मिनिटे मैदान गाजवणाऱ्या नेमारने १५ ड्रिबल, ११३ टच, १ असिस्ट, ५ की-पास देत सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
लाइपझीग विरुद्ध ॲटलेटिको डी मॅद्रिदचा सामना एकतर्फी होईल असा अनेकांचा अंदाज होता त्यामागे कारण पण तसेच होते यंदाच्या प्रिमियर लीगचा विजेता आणि मागील वर्षीचा चॅम्पियन्स लीग विजेत्या लिव्हरपूलला ॲटलेटिकोने घरचा रस्ता दाखवला होता पण लाइपझीगचा संघ सामन्यात प्रत्येक ठिकाणी उजवा ठरला. पूर्वार्धात गोलरहित राहिलेल्या सामन्याने उत्तरार्धात रंजक वळण घेतले. ५० व्या मिनिटाला लाइपझीग तर्फे डॅनियल ओलमोने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण ७० व्या मिनिटाला ॲटलेटिकोच्या फेलिक्सने पेनल्टीवर गोल करत संघाला पुन्हा एकदा बरोबरीत आणले.
सामना शेवटच्या काही मिनिटात पोहचला असताना लाइपझीगतर्फे ॲडम्सने ८८ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात संघाला २-१ ची निर्णायक आघाडी मिळवून दिली. या विजयात लाइपझीगच्या प्रशिक्षकाचा मोठा वाटा आहे. ११ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संघाचे प्रशिक्षक ज्युलियन नॅगलस्मन सुद्धा अवघ्या ३३ वर्षाचे आहेत.
तिसऱ्या सामन्याकडे सर्व फुटबॉल प्रेमिंचे लक्ष लागले होते हा सामना अटीतटीचा होईल अशी सर्वांना अपेक्षा होती पण झाले काही तरी वेगळेच. बायर्नने बार्सिलोनाचा तब्बल ८-२ ने पराभव करत सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. १० गोल झालेल्या या सामन्यात ९ गोल बायर्न संघाच्या खेळाडूंनी मारले तर केवळ १ बार्सिलोनाच्या सुवारेझला मारता आला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून बायर्नने सामन्यावर आपली पकड ठेवली. बार्सिलोनाच्या संघाला बॉल आपल्या ताब्यात ठेवताना सुद्धा खूप संघर्ष करावा लागत होता.
बायर्नच्या खेळाडूंच्या वेगाने खेळताना बार्सिलोनाच्या खेळाडूंची दमछाक होताना दिसत होती. बार्सिलोना संघाच्या खेळाडूंचे सरासरी वय २९ वर्ष ३२९ दिवस एवढे होते जे आजपर्यंतचे सर्वाधिक आहे त्यामुळेच फिटनेस वेग या विभागात संघ बायर्न विरुद्ध कमकुवत ठरला. बायर्नने पूर्वार्धात ४ आणि उत्तरार्धात ४ गोल केले. मेस्सी संघात असताना पहिल्यांदा बार्सिलोनाने ४ पेक्षा अधिक गोलने पराभव पाहिला आहे.
उपांत्यपूर्व फेरीचा शेवटचा सामना मँचेस्टर सिटी विरुद्ध लिओन झाला. रियाल माद्रिद विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यातच सिटीचा संघ लयीत दिसत नव्हता पण लिओन विरुद्ध संघ विजय मिळवेल असा सर्वांचा अंदाज होता पण लिओन संघाने सर्वांचे भाकीत चुकीचे ठरवत सिटीचा १-३ ने धुव्वा उडविला. या पराभवाबरोबरच पेप गार्डियोलाचे चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. स्टर्लिंगने सिटी सामन्यात १-२ ने मागे असताना गोल करून सामना बरोबरीत आणण्याची एक सुवर्णसंधी सोडली आणि ती नंतर सिटीला खूप महागात पडली. लिओन तर्फे मुसा देंबेलेने अखेरच्या १० मिनिटात २ गोल करत लिओनला विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. सिटी तर्फे एकमेव गोल ६९ व्या मिनिटला डी ब्रूयनेने केला.
या सामन्यानंतर आता उपांत्य फेरीचे सामने १९ आणि २० ऑगस्टला होणार आहेत.
पहिला सामना १९ ऑगस्टला लाइपझीग विरुद्ध पीएसजी तर दुसरा सामना २० ऑगस्टला लिओन विरुद्ध बायर्न.