औरंगाबाद, ३१ मे २०१७ : ईएमएमटीसी यांच्या तर्फे आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या १५००० डॉलर एन्डयुरन्स औरंगाबाद खुल्या महिला आयटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशांतील बहुतांश अव्वल भारतीय महिला टेनिसपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. हि स्पर्धा डिव्हीजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गारखेडा येथील टेनिस कोर्टवर ३ ते १० जुन २०१७ या कालावधीत रंगणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी एकूण १५००० हजार डॉलर(१० लाख रुपये) रकमेची पारितोषिक देण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय महिला टेनिसपटूंसाठी एन्डयुरन्स यांनी पाठिंबा दिला आहे.अनुराग आणि वर्षा जैन यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये भारतात होणारी ही केवळ दुसरी महिला टेनिस स्पर्धा असून प्रचंड पैसे खर्च करून सातत्याने परदेशात खेळावे लागणाऱ्या भारतीय महिला टेनिस खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधीच ठरणार आहे. या स्पर्धेमुळे भारतीय महिला खेळाडूंना अतिशय बहुमोल अशा गुणांची कमाई करण्यास मदत होणार आहे. तसेच, आयटीएफ दर्जाच्या स्पर्धेमध्ये भारतीय महिला खेळाडूंना आयटीएफ गुणांची कमाई करून आपले मानांकन सुधारण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेच्या संयोजन सचिव रिहा जैन यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्याला १२ डब्ल्युटीए गुण व २३५२ डॉलर, उपविजेत्याला ७ डब्ल्युटीए गुण व १४७० डॉलर, उपांत्य फेरीतील खेळाडूंना ४ डब्ल्युटीए गुण व ७३४ डॉलर , उपांत्यपुर्व फेरीतील खेळाडूला २ डब्ल्युटीए गुण व ३६७ डॉलर तर स्पर्धेतील अंतिम १६ च्या यादीतील खेळाडूंना १ डब्ल्युटीए गुण व २९४ डॉलर, ३२ च्या यादीतील खेळाडूंना १४७ डॉलर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील दुहेरी गटासाठी विजेत्या जोडीला १२ डब्ल्युटीए गुण व ९५५ डॉलर, उपविजेत्या जोडीला ७ डब्ल्युटीए गुण व ५१५ डॉलर, उपांत्य फेरीतील विजेत्यांना ४ डब्ल्युटीए गुण व २९४ डॉलर, उपांत्यपुर्व फेरीतील जोडीला १ डब्ल्युटीए गुण व १४७ डॉलर तर १६ च्या यादीतील खेळाडूंना ७४ डॉलर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी अव्वल भारतीय टेनिस ऑफिशियल आणि गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीएफ रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून श्रीराम गोखले यांची चेअर अंपायर पदी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवारपासून सुरुवात होणार असून पात्रता फेरीच्या सामन्यांना शनिवारपासून प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
१.स्नेहादेवी रेड्डी(भारत), २.झीओक्सी झाओ(चीन), ३.सौजन्या बाविशेट्टी(भारत), ४.फिओना कोडिनो(फ्रांस), ५.निधी चिलुमुला(भारत), ६.साई संहिता चमर्थी(भारत), ७.प्रांजला येडलापल्ली(भारत), ८.अलेकंझ्यांद्रा वॉल्टर्स(ऑस्ट्रेलिया)