भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर मालिकेचा तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळला जाणार आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवाचा भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या पराभवामुळे भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील मार्ग अधिकच खडतर झाला. आता रोहित शर्मा आणि ब्रिगेडला प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीनं उचलावं लागणार आहे.
टीम इंडियाला ॲडलेड कसोटीत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, ज्यात त्यांना पुढील कसोटीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियावर पलटवार करण्यासाठी भारतीय संघाला कोणते चार बदल करावे लागतील ते जाणून घेऊया.
रोहित शर्मानं सलामीला यावं – रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलनं पर्थ कसोटीत चांगली कामगिरी केली होती. मात्र आता संघात परतल्यानंतर हिटमॅननं त्याच्या नियमित जागी खेळावं. ॲडलेड कसोटीत रोहितनं बऱ्याच काळानंतर मधल्या फळीत फलंदाजी केली. तेथे तो अजिबात लयीत दिसला नाही. दुसरीकडे, केएल राहुलला अलीकडच्या काळात मधल्या फळीत फलंदाजीचा अनुभव आहे. अशा स्थितीत राहुलला पुन्हा मधल्या फळीत पाठवण्याची गरज आहे.
अश्विनच्या जागी जडेजा किंवा सुंदर – भारतीय संघानं पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली होती. तर ॲडलेड कसोटीत आर अश्विन खेळला. मात्र या दोन कसोटीत हे दोन्ही खेळाडू आपली छाप सोडू शकले नाही. अशा स्थितीत टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला आजमावू शकते. जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही योगदान देऊ शकतो. जडेजानं यापूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना अडचणीत आणलं आहे.
हर्षित राणाच्या जागी आकाशदीप – ॲडलेड कसोटीत हर्षित राणा हा भारतीय वेगवान आक्रमणाचा कमकुवत दुवा होता. पहिल्या डावात त्यानं 16 षटकं टाकली, ज्यात त्यानं 5.40 च्या इकॉनॉमीनं एकही विकेट न घेता 86 धावा दिल्या. राणा बॅटनंही फ्लॉप झाला. त्याला दोन्ही डावात खातंही उघडता आलं नाही. अशा स्थितीत गाबा कसोटीत आकाशदीपला संधी देऊन भारत आपलं वेगवान गोलंदाजी आक्रमण मजबूत करू शकतो. आकाशदीपनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली होती. प्रसिद्ध कृष्णा देखील एक चांगला पर्याय आहे.
फलंदाजीत संयमाची आवश्यकता – भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर जेवढे ठाम राहतील, तेवढा जास्त त्यांना त्रास होईल. ही रणनीती टीम इंडियानं मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अवलंबली होती. पर्थ कसोटीत भारतीय खेळाडूंनी जसा संयम दाखवला, तसा ते ॲडलेडमध्ये दाखवू शकले नाहीत. पहिल्या डावात एकही भारतीय फलंदाज 70 चेंडू खेळू शकला आला नाही, तर दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला 50 चेंडूही खेळता आले नाहीत. भारतीय फलंदाजांना गाबामध्ये आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. काही खेळाडूंना त्यांच्या बचावावर आत्मविश्वास दाखवत दीर्घकाळ फलंदाजी करावी लागेल.
हेही वाचा –
“आता नाही तर कधी …” मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या निर्णयाबाबत माजी क्रिकेटपटूने बीसीसीआयला सुनावले
भारताला मागे टाकत इंग्लंडची ऐतिहासिक कामगिरी, WTC मध्ये अभिमानास्पद इतिहास रचला!
रोहित शर्मा संघाच्या नेतृत्वात का फ्लॉप ठरतोय? माजी क्रिकेटपटूनं दिलं धक्कादायक उत्तर






