कोणत्याही क्रिकेटपटूचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे आपल्या देशासाठी खेळणे होय. हे करत असताना आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले जाणे म्हणजे दुग्धशर्करा योग. मात्र हे केवळ काही खेळाडूंसोबतच घडते. असेच एक खेळाडू चार्ल्स बॅनरमॅन होय. ज्यांची आज (०३ जुलै) १७१ वी जयंती.
बॅनरमन यांचा जन्म ३ जुलै १८५१ रोजी इंग्लंडमधील केंट येथे झाला. मात्र ते ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळले. कारकीर्दीत त्यांनी फक्त तीन कसोटी सामने खेळले. परंतु, त्यांच्या नावे असलेले विक्रम जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कसोटी इतिहासातील पहिला चेंडू खेळण्याचा, पहिली धाव घेण्याचा, पहिले अर्धशतक आणि शतक झळकावण्याचा असे अनेक विक्रम त्यांच्या नावे जमा आहेत.
पहिल्या सामन्यात बनवले अनेक विक्रम
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला सामना १५ मार्च १८७७ रोजी सुरू झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चार्ल्स बॅनरमन आणि नॅट थॉमसन फलंदाजीसाठी आले. स्ट्राइक बॅनरमन यांनी घेतली आणि कसोटी इतिहासातील पहिला चेंडू खेळणारे फलंदाज बनले. यानंतर त्यांनी सामन्यात एक-एक करून अनेक विक्रम रचले. त्यांनी आधी अर्धशतक आणि त्यानंतर शतक झळकावले.
कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावून १६६ धावा केल्या. बॅनरमन १२६ धावांवर नाबाद राहिले. दुसर्या दिवशी १६५ धावांवर खेळत असताना त्यांच्या बोटाला दुखापत झाली आणि ते रिटायर हर्ट होऊन तंबूत जाणारे पहिले फलंदाज बनले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या. त्यापैकी एकट्या बॅनरमन यांनी १६५ धावा केल्या होत्या. पूर्ण झालेल्या कसोटी सामन्यातील टक्केवारीच्या दृष्टीने एकाच फलंदाजाने ठोकलेल्या या आजही सर्वाधिक धावा आहेत. बॅनरमन यांच्या १६५ धावा संघाच्या धावसंख्येच्या ६७% होत्या. मात्र दुसर्या डावात ४ धावा करुन बॅनरमन बाद झाले.
तीन सामन्यांची राहिली कारकीर्द
कसोटी इतिहासातील पहिले शतक झळकावल्यानंतर बॅनरमन आपल्या कारकिर्दीत पुन्हा कधीही ३० पेक्षा जास्त धावा करू शकले नाहीत. आजारपणामुळे ते ऑस्ट्रेलियासाठी फक्त तीन कसोटी सामने खेळू शकला. मात्र, त्यांचे नाव क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये नोंदले गेले.
बॅनरमन यांनी ऑस्ट्रेलियाकडून ३ कसोटीत सुमारे ६० च्या सरासरीने २३९ धावा केल्या. त्याचबरोबर त्यांनी ४४ प्रथमश्रेणी सामन्यांत १६८७ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या नावावर एक शतक आणि ९ अर्धशतके आहेत. विशेष म्हणजे चार्ल्स यांचे भाऊ एलेक बॅनरमन देखील ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळले. त्यांनी २८ कसोटी सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने ११०८ धावा केल्या. एलेक ही आपल्या कारकीर्दीत एकही शतक करु शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
मराठीत माहिती- क्रिकेटर हरभजन सिंग
‘आम्ही मरू शकत होतो…’, वेस्ट इंडीज दौऱ्यात बांगलादेशच्या संघासोबत नक्की काय घडले?
जडेजाचे शतक अन् बुमराहची फटकेबाजी! वाचा सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काय काय घडलं