२००८ ला जेव्हा आयपीएल सुरू झाली तेव्हा क्रिकेटजगताने अनेक नव्या गोष्टी पाहिल्या. वेगवेगळ्या देशांचे इंटरनॅशनल क्रिकेटर एकाच संघामध्ये खेळत होते. अमाप पैसा होता. एकाच वेळी अनेक सेलिब्रिटी स्टेडियममध्ये येऊन संघांना पाठिंबा करू लागलेले. त्याचबरोबर एक गोष्ट देखील सारे जण पहिल्यांदाच पाहत होते, ती म्हणजे चिअर लिडर्स. सीमारेषेच्या बाहेर एका छोट्याश्या स्टेजवर चार-पाच चिअर लीडर्स आपापल्या संघासाठी नाचताना दिसायच्या. आपल्या संघाने चौकार मारो, षटकार मारो नाही तर विकेट घेवो, त्यांचं काम एकच नाचायचे. या सुंदर विदेशी ललना स्टेडियममध्ये आणि टीव्हीवर चर्चेचा विषय ठरत असायच्या. छोट्या कपड्यातील या चिअर लिडर्स पाहून अनेक जण नाके मुरडायचे. तर काही बोलायचे असू दे की, काय होतंय त्याला?. पण याच चिअर लिडर्सपैकी एकीने असा काही वाद निर्माण केला, ज्यामुळे आयपीएलची साऱ्या जगात छी थू झाली.
चीअर लीडर्स या फक्त डान्सर नसतात. अमेरिका इंग्लंडमध्ये त्यांचा खास अभ्यासक्रम असतोय. त्यानंतर जगभरातील मोठ्या इवेंटमध्ये त्यांना परफॉर्म करायची संधी मिळते. आयपीएलमध्ये ही संकल्पना विजय मल्ल्यांनी आणायचं ठरवलं होतं. खासकरून दक्षिण आफ्रिकेतून आयपीएलसाठी प्रत्येक टीम चिअर लिडर्स आणायची.
चिअर लीडर्समूळे आयपीएलला ग्लॅमरचा तडका मिळत होता. अचानक २०११ मध्ये याच चिअर लीडर्सपैकी एकीने असा काही बॉम्ब टाकला की, आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली. मुंबई इंडियन्सच्या चिअर लिडींग टीमची मेंबर असलेल्या गॅब्रिएला पास्क्युलोट्टो हिने आपल्या ब्लॉगमध्ये अनेक गंभीर आरोप केले. माय आयपीएल डायरीज नावाने ब्लॉग तिने, आयपीएलमध्ये प्लेयर्स स्पॉन्सर कशी वागणूक देतात याविषयी लिहिले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा सर्वांवर नजर ठेवून असतो तर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर खूपच नॉटी असतात असे तिने म्हटले. तिने एडन ब्लिझार्ड आणि डॅन ख्रिस्टीयन हे खूपच जवळीक साधायचा प्रयत्न करायचे असेही म्हटले. तिने केलेल्या एका खुलाशाची सर्वत्र चर्चा झाली. अनेकदा चिअर लीडर्सला प्लेयर्स आणि स्पॉन्सरसोबत इंटिमेट की व्हायला लागते असे ती म्हणाली.
सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनीबद्दल मात्र तिने चांगले वक्तव्य केले. हे दोघे क्वचितच पार्टीत दिसतात असे तिने म्हटलेले.
गॅब्रिएलाच्या आरोपांनी वादाची ठिणगी पडली होती. सर्वात आधी तर तिला चिअर लीडर्स ग्रुपमधून काढून टाकत दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आले. इथेच आयपीएल बॅकफुटवर आली. गॅब्रिएलाला जगभरातील चिअर लीडर्सचा पाठिंबा मिळू लागला. इकडं चौकशांचा ससेमिरा सुरू झाला. आयपीएलवर जबरदस्त टीका होऊ लागली. कोणी आयपीएल बंद करा म्हणाले. शिवसेना आणि काही संघटनांनी चिअर लीडर्स ही संकल्पनाच भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे म्हणत त्यांना आयपीएलमधून काढून टाकण्यात यावे असे सुचवले. दुसरीकडे अनेकांनी खेळाडूंना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. काहींनी गॅब्रिएला ही फक्त पब्लिसिटी स्टंट म्हणून हे सारं करत असल्याचे म्हटले. प्रकरण तापू लागल्यावर काही आयपीएल टीम्सने स्मार्ट गेम खेळला. आपल्या सर्वच विदेशी चियरलिडर्सना त्यांच्या देशात पाठवत भारतीय ट्रॅडिशनल लूकमधील चिअर लिडर्स त्यांनी उभ्या केल्या.
पुढे प्रकरण एकप्रकारे दाबलं गेलं आणि त्याची जास्त चर्चा झाली नाही. याच गॅब्रिएलाला काही दिवसातच चक्क बॉलीवुड फिल्मची ऑफर आली. तिने मात्र ती स्वीकारली नाही. गॅब्रिएलाने यानंतर हे चिअर लीडर म्हणून आपले प्रोफेशन सुरूच ठेवले.. ती चिअर लिडर्सविरूद्ध होणार्या अन्यायावर नेहमी लिहीत असते.
गॅब्रिएलाच्या या प्रकरणानंतर पुढच्या वर्षी आयपीएल पार्टीतील ल्युक पॉमर्सबॅचचे प्रकरण समोर आले. यामुळे आयपीएल पार्टींविषयी उलटसुलट चर्चा व्हायला लागल्या. शेवटी बीसीसीआयने त्यावर निर्बंध घालायचे ठरवले. चिअर लिडर्सही कमी अधिक प्रमाणात दिसू लागल्या. तरीही त्यावेळी अवघ्या २२ वर्षांच्या असलेल्या गॅब्रिएला पास्क्युलोट्टोने हिम्मत दाखवून, जे काही खुलासे केले, ते आयपीएलला बदनाम करण्यासाठी आणि आयपीएलची दुसरी बाजू समोर आणण्यासाठी पुरेसे ठरले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?
स्टार स्टडेड कोची टस्कर्स एकाच सीझननंतर आयपीएलमधून बाहेर का झाली?
मेयर्स आणि ब्रूक्सची शतके, वेस्ट इंडिजने २० धावांनी जिंकली तिसरी वनडे; मालिकाही घातली खिशात