आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आगामी हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना आणि शिवम दुबे यांना कॅप्ड स्लॉटमध्ये रिटेन केलं, तर अनुभवी महेंद्रसिंह धोनीचा अनकॅप्ड खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. चेन्नईकडे मेगा ऑक्शनमध्ये 55 कोटी रुपयांची रक्कम असेल. याशिवाय त्यांच्याकडे आरटीएम कार्ड देखील उपलब्ध आहे.
आता लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जसंबधी एक नवा अहवाल समोर आला आहे. मेगा लिलावात चेन्नईची नजर दिल्ली कॅपिटन्सनं रिलिज केलेल्या रिषभ पंतवर असेल, असं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलंय. मात्र एका नव्या वृत्तानुसार, चेन्नईची टीम अनुभवी फिरकीपटू आर अश्विनवर देखील दाव लावण्याची शक्यता आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, आर अश्विननं आपल्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जकडूनच केली होती. तो फ्रँचायझीसाठी अनेक सीझन खेळला. मात्र 2018 मध्ये संघानं त्याला रिटेन केलं नाही. त्यानंतर तो पंजाब किंग्जमध्ये गेला. तेथे त्यानं संघाचं नेतृत्व देखील केलं होतं. यानंतर तो दिल्ली कॅपिटल्स आणि अगदी अलीकडे राजस्थान रॉयल्सकडून खेळला. आता आयपीएल 2025 पूर्वी राजस्थाननं अश्विनला रिटेन केलेलं नाही. अशा परिस्थितीत तो मेगा लिलावात उतरणार आहे, जेथे चेन्नई त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता आहे.
चेन्नईचं चेपॉक मैदान हे अश्विनचं होम ग्राउंड आहे. तो येथे भरपूर क्रिकेट खेळला आहे. याशिवाय तो चेंडूसह बॅटनं देखील योगदान देऊ शकतो. विशेष म्हणजे, 38 वर्षीय अश्विननं काही महिन्यांपूर्वी सीएसकेकडून पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता त्याची ही इच्छा पूर्ण होते की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
हेही वाचा –
रिषभ पंतचं मुंबईत विक्रमी अर्धशतक, न्यूझीलंडविरुद्ध केला मोठा पराक्रम
धक्कादायक! पाकिस्ताननंतर युएईकडून देखील भारताचा पराभव
भारतीय चाहत्यांना लवकर व्हिसा मिळणार, चॅम्पियन ट्रॉफीच्या आयोजनासाठी पाकिस्तानची नवी खेळी