मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ५९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघ आमने-सामने आले होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या दोन्ही संघातील सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने बाजी मारली. चेन्नईच्या या पराभवानंतर त्यांचे आयपीएल २०२२ मधील आव्हान संपुष्टात आले. पण असे असले तरी, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने संघातील युवा गोलंदाजांचे कौतुक केले आहे.
या सामन्यात (CSK vs MI) प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची फलंदाजी निराशाजनक राहिली. केवळ एमएस धोनीने (MS Dhoni) ३० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने नाबाद ३६ धावा करताना चेन्नईला ९७ धावापर्यंत पोहचवले. त्यानंतर ९८ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.५ षटकात पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईचा पराभव झाला. पण गोलंदाजीत चेन्नईचा गोलंदाज मुकेश चौधरीने प्रभावित करताना ३ विकेट्स घेतल्या.
धोनीने केले गोलंदाजांचे कौतुक
मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर देखील धोनीने वेगवान गोलंदाजांचे कौतुक (Praise Fast Bowlers) केले आहे. तो म्हणाला, ‘खेळपट्टी कशीही असली, तरी १३० धावांच्या आतील कोणतीही धावसंख्या रोखण्यास अवघडच असते. पण मी गोलंदाजांना सांगितले, की तुमची क्षमता दाखवा आणि निकालाचा विचार करू नका. दोन्ही वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि मला वाटते की, असे सामने त्यांना त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास जास्त मदत करू शकतात, मग परिस्थिती कशीही असली तरी.’
तो पुढे म्हणाला, ‘आम्ही अशा काळातूनही गेलो, जिथे आमच्याकडे चांगल्या गोलंदाजांची बेंच स्ट्रेंथ नव्हती. तसेच वेगवान गोलंदाजांना परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. पण, जर तुम्ही सुदैवी असाल, तर तुम्हाला असा गोलंदाज मिळतो, जो सहा महिने सर्व प्रकारात क्रिकेट खेळताना दिसेल. माझ्या मतानुसार आयपीएल त्या सर्वांसाठी एक अशी संधी आहे, ज्यात ते खेळून थोडे निर्भय आणि साहसी होतील, कारण ही गोष्ट या क्रिकेट प्रकारासाठी महत्त्वाची आहे. काही खेळाडू त्यांची योजना राबवण्यापूर्वी थोडा वेळ घेतात.’
If you are one of the young Indian speedsters playing the #TATAIPL, this will encourage you even more. ☺️ ☺️
Hear what the legendary MS Dhoni said 👇 #CSKvMI pic.twitter.com/aWgvsQZq4o
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
याबरोबरच धोनीने असेही संकेत दिले की, पुढील हंगामात ते आणखी मजबुतीने उतरतील. त्याने सांगितले की, पुढच्या हंगामात आणखी दोन वेगवान गोलंदाज संघात सामील होतील, तसेच काही आणखी खेळाडू आहेत, जे संघाला मजबूती देऊ शकतात. त्याचबरोबर तो म्हणाला की, अशा खेळाडूंना काही वेळ तयारीसाठी द्यायचा आहे. तसेच तो म्हणाला, आशा आहे की खेळाडू प्रत्येक सामन्यातून काहीतरी शिकतील.
चेन्नईची निराशाजनक कामगिरी
चेन्नईने आयपीएल २०२२ हंगामात १२ सामन्यांत ४ सामने जिंकले असून ८ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आयपीएल २०२२ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये न पोहचण्याची चेन्नईची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२० मध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
प्लेऑफची आशा जिवंत, पण विजयाची आशा धूसर; कोलकाताचा हुकमी एक्का आयपीएलमधून आऊट
चेन्नई विरुद्ध ‘कॅप्टन’ रोहित ‘हिट’! कर्णधारांच्या ‘या’ यादीत अन्य कोणी जवळपासही नाही
‘त्याने’ हॅट्रिक घेतली, ५६४ विकेट्स घेतल्या आणि शेवटी कोच बनल्यावर झाले मॅच फिक्सिंगचे आरोप