इलेक्टोरल बाँडवरून सध्या देशाचं राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयापासून ते निवडणूक आयोगापर्यंत यावर कठोर कारवाई करत आहेत. यावरून सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात ‘एसबीआयला’ही फटकारलं होतं, कारण बँकेनं निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँड्सची माहिती दिली नव्हती.
अनेक कंपन्यांनी देशातील राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँडद्वारे निधी दिला होता, ज्याबाबत आता खुलासे होत आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स म्हणजेच सीएसकेनं देखील एका पार्टीला मोठा निधी दिल्याचं उघडकीस आलंय. या बातमीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके, ‘चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवते. या कंपनीची मूळ संस्था ‘इंडिया सिमेंट’ आहे, जिचे मालक एन श्रीनिवासन आहेत. चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडनं तामिळनाडूचा पक्ष ‘ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम’ अर्थातच एआयएडीएमके (AIADMK) ला इलेक्टोरल बाँड्सद्वारे देणगी दिल्याचं उघडकीस आलंय. रिपोर्टनुसार, एआयएडीएमकेला एकूण 6.05 कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळाले. यापैकी सुमारे 90 टक्के पैसा सीएसके क्रिकेट लिमिटेड कडून आला आहे.
अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडनं एआयएडीमकेला हे पैसे 2019 मध्ये दिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सीएसके क्रिकेट लिमिटेडनं केवळ दोन दिवसांत या पार्टीला 5 कोटी रुपयांचा निधी दिला होता. 2 ते 4 एप्रिल 2019 दरम्यान हा निधी देण्यात आला. मात्र यानंतर सीएसकेनं एआयएडीएमके पक्षाला इलेक्टोरल बाँड्सद्वारे एक पैसाही दिला नाही.
पक्षाला कोईम्बतूरस्थित लक्ष्मी मशीन वर्क्स लिमिटेडकडून एक कोटी रुपये आणि चेन्नईस्थित गोपाल श्रीनिवासन यांच्याकडून 5 लाख रुपयांची राजकीय देणगी मिळाली आहे. मात्र, ही बाब कोणापासून लपून राहिलेली नाही. कारण पक्षानेच या देणगीबाबत दोनदा माहिती दिली होती. 2019 मध्ये तत्कालीन समन्वयक ओ. पनीरसेल्वम आणि त्यानंतर 2023 मध्ये सरचिटणीस इडाप्पाडी के. पलानीस्वामी यांनी याबाबत सांगितलं होतं. मात्र पक्षाला चेन्नई सुपर किंग्जकडून देखील निधी मिळाला असल्याची बाब आता उघडकीस आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 पूर्वी फार्मात आला गुजरात टायटन्सचा गोलंदाज, इतर संघांसाठी धोक्याची घंटा!
भावा! सोशल मीडियावर सगळीकडे आरसीबीचीच हवा! ट्रॉफी उचलतानाच्या फोटोनं रचला नवा इतिहास
आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू भारतात दाखल, तब्बल 9 वर्षांनी करतोय पुनरागमन!