आयपीएल 2024 च्या प्लेऑफची समीकरणं आता हळूहळू स्पष्ट होत आहेत. रविवारी (५ मे) चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला.
या विजयासह चेन्नईचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. मात्र अजूनही इतर संघांचे बरेच सामने बाकी आहेत. त्यामुळे टॉप-4 चं स्थान अनेक वेळा बदलू शकतं. अशा परिस्थितीत गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चेन्नई प्लेऑफमध्ये कोणत्या मार्गानं पोहोचू शकते? प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला इतर संघांवर अवलंबून राहावं लागू शकतं का? या सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देणार आहोत.
चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. संघानं यापैकी 6 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. सीएसकेचे लीग टप्प्यात अजून 3 सामने बाकी आहेत. जर संघानं उर्वरित सर्व सामने जिंकले तर चेन्नई प्लेऑफसाठी सरळ पात्र होईल. जर सीएसकेनं किमान 2 सामने जिंकले तर त्यांचे 16 गुण होतील. सहसा, 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करतो. परंतु अशा परिस्थितीत चेन्नईला इतर संघांच्या रनरेटवर अवलंबून राहावं लागेल. राजस्थान रॉयल्सचे सध्या 16 गुण आहेत, परंतु ते अद्याप अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नाहीत.
चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना गुजरात टायटन्स विरुद्ध आहे, जे स्वत: प्लेऑफच्या शर्यतीत जर-तर वर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याचा निकाल ठरवू शकतो की दोनपैकी कोणता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाईल. चेन्नईचे त्यापुढचे 2 सामने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
42 वर्षीय धोनीनं सर्वांना टाकलं मागे, बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक
विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद, शिवम दुबेला झालं तरी काय?