इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. ३ वेळची आयपीएल विजेती चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. शुक्रवार रोजी (१५ ऑक्टोबर) दुबईच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात उभयंते तगड्या प्लेइंग इलेव्हनसह उतरतील. अशात एमएस धोनी एका प्रमुख खेळाडूला चेन्नई संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवू शकतो. हा खेळाडू म्हणजे, सुरेश रैना होय.
आयपीएलच्या ११ हंगामात चेन्नईचे प्रतिनिधित्व केलेल्या रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाते. तो या हंगामात तितकासा यशस्वी ठरला नसला तरी, त्याला सातत्याने संघात स्थान देण्यात येत होते. मात्र प्लेऑफ सामन्यांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली. अशावेळी त्याच्या जागी चेन्नईने अनुभवी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला खेळवले गेले. उथप्पाने कर्णधार आणि संघाच्या विश्वासावर खरे उतरत दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली.
त्याने महत्त्वपूर्ण अशा या सामन्यात ६३ धावांची उपयुक्त खेळी केली होती. ४४ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा चोपल्या होत्या. त्याच्या या योगदानामुळे चेन्नई संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएल अंतिम सामन्यात प्रवेश करू शकला.
दुसरीकडे रैनाची यावर्षीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या १२ सामन्यांत ३२ च्या सरासरीने फक्त १६० धावा केल्या आहेत.
आयपीएल अंतिम सामन्यातील आकडे रैनाच्या बाजूने
जरी रैना आयपीएल २०२१ मध्ये विशेष फॉर्ममध्ये दिसला नसला तरीही, त्याची आयपीएल अंतिम सामन्यांची आकडेवारी मात्र प्रशंसनीय राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ८ आयपीएल अंतिम सामन्यांमध्ये ३५.५७ च्या सरासरीने २४९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचाही समावेश आहे. अशात चेन्नईचा कर्णधार धोनी या महामुकाबल्यात पुन्हा एकदा रैनावर विश्वास दाखवतो की नाही? हे पाहावे लागेल.
अंतिम सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन– फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दिपक चाहर.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विश्वचषकात इतर संघ आम्हाला घाबरतील’; इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा आशावाद
“अश्विनसारख्या गोलंदाजाला मी कधीही संघात घेणार नाही”; भारतीय दिग्गजाने केली आगपाखड