१९ सप्टेंबर २०२०, आजची तारिख… अखेर तो दिवस उजाडला आहे, ज्याची सर्वजण डोळ्यात तेल घालून वाट पाहात होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ७.३० वाजल्यापासून जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. अबु धाबी येथे कट्टर विरोधी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात या हंगामातील पहिलाच सामना खेळला जाईल.
आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात यशस्वी २ संघ जेव्हाही आमनेसामने येतात, तेव्हा त्यांच्यात कडी टक्कर पाहायला मिळते. आजचा सामनाही असाच रोमांचक असेल. तत्पुर्वी कर्णधार रोहित शर्माच्या मुंबईला पराभूत करण्यासाठी एमएस धोनी कोणत्या खेळाडूंना मैदानावर उतरवेल, याची सर्वांना उत्सुकता लागली असेल. वैयक्तिक कारणांमुळे यंदा आयपीएल न खेळणारे सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची जागा कोण घेईल?, हा प्रश्नदेखील सर्वांना सतावत असेल.
या लेखात, आम्ही आजच्या सामन्यातील चेन्नईच्या संभावित प्लेइंग इलेव्हन संघाचा आढावा घेतला आहे.
अशी असेल चेन्नई सुपर किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन (Chennai Super Kings Probable Playing XI) –
१. शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसन हा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतो. गतवर्षी या धुरंदरने चेन्नईकडून खेळताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने पूर्ण हंगामात १७ सामने खेळत २३.४१च्या सरासरीने ३९८ धावा केल्या होत्या. शिवाय त्याने अंतिम सामन्यात गुडघ्यातून रक्तस्त्राव होत असतानाही ८० धावांची ताबडतोब खेळी केली होती.
पण, मुंबई इंडियन्सने अंतिम सामना जिंकत चेन्नईचे चौथ्यांदा विजेता ठरण्याचे स्वप्न अधुरे ठेवले होते. पण यंदा वॉटसन ही संधी नक्कीच दवडणार नाही आणि पहिल्या सामन्यापासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात करेल.
२. फाफ डू प्लेसिस
कर्णधार एमएस धोनी पहिल्या सामन्यात वॉटसनसोबत फाफ डू प्लेसिसला सलामीला पाठवेल. दक्षिण आफ्रिकाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसने गेल्या काही वर्षांपासून चेन्नईकडून सलामीला फलंदाजी करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. गतवर्षीच्या दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात डू प्लेसिसने सलामीला फलंदाजी करताना दमदार अर्धशतकी खेळी करत चेन्नईला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
३. अंबाती रायडू
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाच्या गैरहजेरीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी अंबाती रायडू उतरु शकतो. रायडूने २०१८साली चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. पण, हाच दमदार फलंदाज गतवर्षी फ्लॉप ठरला होता. त्याने पूर्ण हंगामात १७ सामने खेळत फक्त २८२ धावा केल्या होत्या. पण यंदा रैनाने वैयक्तिक कारणामुळे संघाची साथ सोडली आहे. त्यामुळे रायडूला त्याची घ्यावी लागणार आहे.
४. एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. जुलै २०१९मधील सामन्यापासून धोनीने क्रिकेट खेळलेले नाही. गतवर्षी त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. त्याने पूर्ण हंगामात १५ सामने खेळत सर्वाधिक ४१६ धावा केल्या होत्या. यासह तो चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यावर्षीही धोनीकडून असेच दमदार प्रदर्शन करण्याची अपेक्षा आहे.
५. केदार जाधव
चेन्नईच्या मधल्या फळीतील फलंदाजीची जबाबदारी केदार जाधवच्या खांद्यावर असेल. केदारला त्याच्या फिटनेसमुळे नेहमी समस्या उद्भवत असतात. परंतु यंदा तो फिट दिसत आहे. त्यामुळे तो नक्कीच दमदार फलंदाजी करताना दिसेल आणि गतवर्षीपेक्षा शानदार प्रदर्शन करताना दिसेल.
६. रविंद्र जडेजा
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद जडेजा हा यावेळी ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. गेल्या २ वर्षांपासून जडेजाचे फलंदाजी प्रदर्शन शानदार राहिले आहे. गतवर्षी त्याने ९ डावात फलंदाजी करताना १०९ धावांचा आकडा गाठला होता. याबरोबरच त्याने गोलंदाजीतही संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. गतवर्षी त्याने १५ विकेट्स चटकावल्या होत्या.
७. ड्वेन ब्रावो
ड्वेन ब्रावो सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच आपल्या सीपीएलमधील ट्रिंबँगो नाईट रायडर्स संघाला विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. सीपीएलप्रमाणे तो आयपीएलमध्ये आपल्या चेन्नई संघासाठी कमालीचे प्रदर्शन करताना दिसू शकतो. तो डेथ ओव्हर्समध्ये संघाच्या फलंदाजीचा भार सांभाळू शकतो. सोबतच त्याचे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या विभागातील प्रदर्शनही चमकदार आहे.
८. दिपक चाहर
उजव्या हाताचा स्विंग गोलंदाज दिपक चाहर हादेखील चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. युएईला पोहोचल्यानंतर चाहर कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. परंतु, आता त्याचा दूसरा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि तो फिट आहे. पावरप्लेमध्ये गोलंदाजी करताना तो नेहमीच चेन्नईसाठी फायद्याचा ठरला आहे. तसेच तो गरजेनुसार फलंदाजीदेखील करु शकतो.
९. पियूष चावला
यावेळी भारताचा गोलंदाज पियूष चावला हा चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. कारण युएईतील मैदाने फिरकीपटूंसाठी सोईस्कर आहेत आणि चावलादेखील फिरकी गोलंदाजी करतो. त्यामुळे कर्णधार धोनी नक्कीच चावलाला यंदा संधी देईल. याबरोबरच संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यंदा आयपीएल खेळणार नाही, त्यामुळे चावलाला त्याची कमी पूर्ण करावी लागणार आहे.
१०. इमरान ताहिर
युएईच्या मैदानावर फिरकीपटू इमरान ताहिर हा कमालीचे प्रदर्शन करत संघासाठी मोलाचा वाटा उचलू शकतो. ताहिरची गतवर्षीची आकडेवारीही उल्लेखनीय राहिली होती. त्याने २६ विकेट्स चटकावत, पूर्ण हंगामात सर्वाधिक विकेट्स चटकावणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला होता. सोबतच त्याने सीपीएल २०२०मधील गोलंदाजी प्रदर्शनाही चांगले आहे.
११. शार्दुल ठाकुर
भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर हादेखील चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असेल. तो गोलंदाजीसह खालच्या फळीत फलंदाजीची भूमिकाही निभावू शकतो. या गोष्टी त्याला संघाच्या अंतिम ११ खेळाडूंचा भाग असण्याचा मुख्य दावेदार बनवतात.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार
हे ३ खेळाडू, जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पहिल्यांदा बनवू शकतात पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा जेव्हा मुंबई इंडियन्स पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
जेव्हा जेव्हा चेन्नई पहिला सामना खेळलीय, तेव्हा तेव्हा पहा काय लागलाय स्पर्धेचा निकाल
या कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स आहे आयपीएल विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार