गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आघाडीवरील मुंबई सिटी एफसीला रोखण्याची कामगिरी चेन्नईयीन एफसीने सोमवारी केली. इस्माईल गोन्साल्वीस याने पेनल्टीवर गेलेल्या गोलमुळे ही लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास मुंबई सिटीकडे एका गोलची आघाडी होती. 21व्या मिनिटाला आघाडी फळीतील नायजेरीयाच्या 36 वर्षीय खेळाडू बार्थोलोम्यू ओगबेचे याने मुंबई सिटीचे खाते उघडले. दुसऱ्या सत्रात 76व्या मिनिटाला आघाडी फळीतील गिनी-बिसाऊचा 29 वर्षीय खेळाडू इस्माईल गोन्साल्वीस याने पेनल्टीवर चेन्नईयीनला बरोबरी साधून दिली.
पूर्वार्धात मुंबईसाठी बचाव फळीतील अमेय रानवडे याने थ्रो-इनवर बॉक्समध्ये चेंडू टाकला, जो चेन्नईयीनच्या एका बचावपटूने हेडिंगद्वारे रोखण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॉक्सबाहेर मध्य फळीतील रॉलीन बोर्जेसकडे गेला. त्याने मध्य फळीतील बिपीन सिंगच्या दिशेने चेंडू मारला. मग बिपीनच्या फटक्यावर ओगबेचेने हेडिंगवर लक्ष्य साधले. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ चकला.
दुसऱ्या सत्रात चेन्नईयीनच्या आघाडी फळीतील जेकब सिल्व्हेस्टर याला मुंबई सिटीचा मध्यरक्षक अहमद जाहू याने पाडले. त्यामुळे रेफरी संतोष कुमार यांनी चेन्नईयीनला पेनल्टी बहाल केली. या पेनल्टीवर गोन्साल्वीसने शांतचित्ताने फटका मारला. त्यावेळी बाजूचा अंदाज चुकल्यामुळे मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग डावीकडे झेपावला, पण चेंडू विरुद्ध बाजूने नेटमध्ये गेला.
मुंबई सिटीची 13 सामन्यांतील तिसरी बरोबरी असून नऊ विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 30 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा ते सहा गुणांनी पुढे आहेत.एटीकेएमबीचे 12 सामन्यांतून 24 गुण आहेत. एफसी गोवा 13 सामन्यांतून 20 गुणांसह तिसऱ्या, तर हैदराबाद एफसी 13 सामन्यांतून 18 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
चेन्नईयीनने एक क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले. 14 सामन्यांत त्यांची तिसरी बरोबरी असून तीन विजय व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला (12 सामन्यांतून 15) मागे टाकले.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ओदिशाविरुद्ध पार्टालूच्या गोलमुळे बेंगळुरूची बरोबरी
आयएसएल २०२० : राहुलच्या गोलमुळे ब्लास्टर्सने गोव्याला रोखले
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम