जून १०, हा दिवस बऱ्याचशा युवा भारतीय क्रिकेटपटूंसाठी अतिशय खास राहिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दिवशी श्रीलंका दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात ५ नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या नव्या चेहऱ्यांमध्ये देवदत्त पड्डीकल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणा, कृष्णप्पा गौतम आणि चेतन सकारिया यांचा समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीगचे मैदान गाजवणारे हे शिलेदार आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाचा युवा गोलंदाज सकारिया यानेही आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी अनेक खुलासे केले आहेत. आता असाच एक गौप्यस्फोट त्याने केला आहे. पहिल्यांदाच भारताच्या ताफ्यात जागा मिळालेल्या सकारियाच्या निवडीची भविष्यवाणी त्याच्याच संघनायकाने केली असल्याचे त्याने सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी आपल्या संघ कर्णधार संजू सॅमसनविषयी बोलताना सकारिया म्हणाला की, “संंजू भाईने माझ्यावर संघातील इतर खेळाडूंपैक्षा जास्त विश्वास दाखवला. त्याने मला आयपीएलदरम्यान म्हटले सुद्धा होते की, मी ज्याप्रकारची गोलंदाजी करत आहे. ते पाहता मला भारतीय संघाची टोपी मिळण्याची वेळ फार लवकरच येईल आणि अगदी झालेही तसेच.”
“आयपीएलनंतर लोकांनी माझे केलेले कौतुक पाहून मला अपेक्षा होती की, मला भारतीय संघात नेट गोलंदाज म्हणून तरी संधी मिळेल. परंतु मी कधीही विचार केला नव्हता की, थेट मुख्य भारतीय संघात माझे नाव येईल. पण आता असे वास्तवात घडले आहे. आता मी माझे सर्वश्रेष्ठ देण्याची तयारी करणार आहे,” असे शेवटी २३ वर्षीय सकारियाने सांगितले.
वेगवान गोलंदाज सकारियावर कोणत्या आयपीएल फ्रँचायझीने बोली लावण्याची ही पहिलीच वेळ होती. आयपीएल २०२१ लिलावात राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने त्याला १.२० कोटींच्या बोलीत विकत घेतले आहे. त्याने संघाच्या अपेक्षांवर खरे उतरत एमएस धोनी, केएल राहुल, रोहित शर्मा अशा फलंदाजांना संकटात पाडले होते. त्याने पूर्ण हंगामात ७ सामने खेळताना ७ विकेट्सची खात्यात नोंद केली आहे. आता तो लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसेल.
असा आहे श्रीलंका दौऱ्याचा कार्यक्रम
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर केवळ मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. १३ जुलै रोजी वनडे सामन्याने या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. १८ जुलै रोजी वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाईल. त्यानंतर २१ ते २५ जुलै या कालावधीत ३ सामन्यांची टी२० मालिका होणार आहे. हे सर्व सामने कोलंबो येथे पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम
वय केवळ आकडा! ३९ वर्षीय माही पळतोय घोड्याच्या बरोबरीने, पत्नीनेही केलं तोंडभरुन कौतुक
व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात