जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या भारतीय संघाला ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी गुरुवारी (१० जून) भारकीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याबरोबरच ५ नेट गोलंदाजांचीही निवड करण्यात आली आहे. या संघात २३ वर्षीय वेगवान गोलंदाज चेतन सकारिया याला जागा देण्यात आली आहे. परंतु याच सकारियाने आपल्या निवडीवर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.
देशांतर्गत क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर सकारियाचे नुकतेच जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पदार्पण झाले होते. त्यातही कोविड-१९ मुळे तो केवळ ७ सामने खेळू शकला. त्यामुळे या प्रदर्शनाच्या जोरावर आपल्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची त्याला फार कमी अपेक्षा होती. त्यातही नशीबाची साथ असल्यास एक नेट गोलंदाज म्हणून संधी मिळेल, असे त्याला वाटले होते. परंतु त्याला थेट मुख्य संघात जागा मिळाल्याने तो चकित झाला आहे.
यासंदर्भात बोलताना सकारिया म्हणाला की, “मी एका नेट गोलंदाजाच्या रुपात श्रीलंका दौऱ्यावर गेलो असतो तर खूप खुष असतो. परंतु मुख्य भारतीय संघात माझे नाव पाहून मी आश्चर्यचकित झालोय. कदाचित मी आयपीएलमध्ये माझ्या अपेक्षांवर खरा उतरलो, यामुळे मला ही संधी मिळाली असावी. मी या संधीचे नाणे खणखणीत वाजवण्यासाठी पूर्णपणे तयार आणि आश्वस्त आहे.”
सौराष्ट्रचा हा वेगवान गोलंदाज आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते माझी गोलंदाजी गती वेगवान आहे. परंतु मला अजून वेगाने चेंडू फेकण्याचा सराव करायचा आहे. मी सध्या चेन्नईत ऊर्जा विकास कार्यक्रमात सहभागी झालो आहे. यामुळे मी स्वत:ला अजून जास्त व्यवस्थित ओळखू लागलो आहे. चेन्नईतील या व्यस्त दिनचर्येशी मी संतुष्ट आहे. मला भारतीय संघासोबत राहून अजून बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत.”
असा असेल भारताचा श्रीलंका दौरा
वनडे मालिका –
१३ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो
१६ जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो
१८ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो
टी२० मालिका –
२१ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो
२३ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो
२५ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमात सचिनच्या पुढे होता ‘हा’ खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची
ऋतुराजला कशी मिळाली भारतीय संघात निवड झाल्याची बातमी? किस्सा आहे अतिशय रोमांचक
दुर्दैव! चालू सामन्यात डू प्लेसिसला झाली गंभीर दुखापत, दवाखान्यात केले गेले भरती