भारत आणि न्यूझीलंडमध्ये गुरुवारी (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्याच्या पहिल्या दिवसी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात पुजारा शून्य धावांवर (डक) बाद झाला. पुजारा मागच्या बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी करू शकलेला नाही. याच कारणास्तव त्याच्या संघातील स्थानाविषयी देखील शंका उपस्थित झाली आहे. या सामन्यात शून्य धावा करून बाद झाल्यामुळे पुजाराने अनेक नकोसे विक्रम देखील स्वतःच्या नावावर केले.
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा शून्यावर बाद झाल्यामुळे त्याच्या शतकाची अधिकच वाट पाहावी लागणार आहे. त्याने भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मागच्या २० डावात एकही शतक केले नाही. तर भारतात आणि विदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांचा विचार केला तर त्याने मागच्या ४१ डावांपासून एकही शतक केले नाहीये. पुजाराने त्याचे शेवटचे शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१९ मध्ये केले होते. त्याने या सामन्यात १९३ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्यात पुजारा शून्यावर बाद होताच त्याने एक नकोसा विक्रम स्वतःच्या नावावर केले. तो क्रमांक तीनवर खेळताना सर्वाधिक वेळा डक झालेला फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याच्या बाबतीत त्याने दिलीप वेंगसरकर यांची बरोबरी केली आहे, जे तिसऱ्याच क्रमांकावर फलंदाजी करायचे. पुजारा आतापर्यंत आठ वेळा शून्य धावांवर बाद झाला आहे. त्याने राहुल द्रविडला या यादीत मागे टाकले आहे, जो सात वेळा डक झाला होता.
चेतेश्वर पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये या सामन्यात १० व्या वेळी खाते न उघडता बाद झाला. तसेच तो न्यूझीलंडविरुद्ध खेळताता पहिल्यांदाच शून्य धावांवर बाद झाला. तो कारकिर्दीत दुसऱ्यांदा एका फिरकी गोलंदाजाचा शून्य धावसंख्येवर शिकार झाला आहे. याआधी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचने त्याला शून्य धावांवर बाद केले होते. या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने ही कामगिरी केली.
चेतेश्वर पुजारा यावर्षी दुसऱ्यांदा शून्य धावांवर बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यापूर्वी तो इंग्लंडसोबत खेळताना अशाच प्रकारे बाद झाला होता. एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत हे त्याचे दुसरे सर्वात खराब वर्ष आहे. यापूर्वी तो २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध शून्य धावांवर बाद झाला होता.