टीम इंडियाचा ‘नवीन भिंत’ चेतेश्वर पुजारा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कौंटी क्रिकेटमध्ये कर्णधार बनताच त्याने शानदार शतक झळकावले आहे. चालू मोसमात ससेक्ससाठी सात सामन्यांमधले पुजाराचे हे पाचवे शतक आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने काऊंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट घेत शानदार सुरुवात केली आहे.
चेतेश्वर पुजाराने १८२ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ११५ धावा केल्या. त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर, लॉर्ड्स येथे मिडलसेक्स विरुद्धच्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोन सामन्याच्या पहिल्या दिवशी ससेक्सने पहिल्या डावात ४ बाद ३२८ धावा करून आपली स्थिती मजबूत केली. तत्पूर्वी, मिडलसेक्सने नाणेफेक जिंकून ससेक्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी २१९ धावा जोडल्या
ससेक्सची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांनी १८ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर सलामीवीर ऍलिस्टर ऑरची विकेट गमावली. यानंतर टॉम अल्स्पोप आणि टॉम क्लार्कने दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सांभाळला. क्लार्क बाद झाल्यानंतर अल्सोपने पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या ३१८ पर्यंत नेली. अलॉस्पने २७७ चेंडूत १३५ धावांची खेळी खेळली. मिडलसेक्सकडून टॉम हेल्मने ३ बळी घेतले.
वॉशिंग्टन सुंदरने ६९ धावांत चार बळी घेतले
भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने नॉर्थम्प्टनशायरविरुद्ध लँकेशायरकडून २० षटकांत ६९ धावांत चार बळी घेतले. सुंदरने विल यंग, रॉब केयो, रायन रिक्लेटन आणि टॉम टेलर यांच्या विकेट घेतल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुंदरने शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. २२ वर्षीय वॉशिंग्टन सुंदर हाताच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये बोटाला दुखापत झाल्यानंतर सुंदरने दीर्घ फॉर्मेटमध्ये पुनरागमन केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इशान किशनवर भडकला सूर्यकुमार यादव! पुढे जे झाले, ते पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा