भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हे इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. पुजारा काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्स संघाकडून खेळतो. मागील काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या पुजारासाठी मंगळवारचा दिवस (१९ जुलै) आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ससेक्सचा नियमित कर्णधार टॉम हेन्सच्या दुखापतीनंतर क्लबने आपला अंतरिम कर्णधार म्हणून पुजाराचे नाव घोषित केले. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर चेतेश्वर पुजारा ससेक्सचे नेतृत्व करताना दिसेल.
ससेक्सचा नियमित कर्णधार टॉम हेन्सला लीसेस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात खेळताना हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला ५ ते ६ आठवडे मैदानाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे पाहता ससेक्सने त्यांचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. मिडलसेक्स आणि ससेक्स यांच्यातील हा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. पुजाराच्या कर्णधारपदावर संघाचे मुख्य प्रशिक्षक इयान सॅलिस्बरी म्हणाले,
“टॉमच्या अनुपस्थितीत पुजारा स्वतः संघाचे नेतृत्व करायला उत्सुक होता. तो जेव्हापासून संघाचा भाग बनला आहे तेव्हापासून निर्णय घेणाऱ्या गटाचा भाग आहेच. तो एक गुणी आणि शानदार व्यक्ती आहे. आम्हाला विश्वास आहे की तो या नव्या जबाबदारीवरही खरा उतरेल.”
Following the news of Tom Haines' injury, Cheteshwar Pujara has been named as interim captain. ©
Good luck to @cheteshwar1 and the team. 👏 #GOSBTS
— Sussex Cricket (@SussexCCC) July 19, 2022
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अपयशी ठरल्याने चेतेश्वर पुजाराला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये काही अर्धशतके झळकावली. इतर खेळाडू आयपीएल खेळत असताना पुजारा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला.
ससेक्ससाठी खेळताना ३४ वर्षीय पुजाराने इंग्लंडच्या भूमीवर आपली चमक दाखवली आणि चार शतके झळकावली. त्यापैकी दोन शतके द्विशतकांमध्ये बदलली. या कामगिरीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय निवड समितीने संधी दिली. जिथे त्याने दुसऱ्या डावात ६६ धावा केल्या. मात्र, या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
युवकांना संधी, कसोटीवर लक्ष, भावूक संदेश देत बेन स्टोक्सची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
ENGvsIND: रिषभ पंतच्या त्या ‘थम्स अप’ इशाऱ्यामागचे रहस्य अखेर उलगडले, व्हिडिओ जोरदार व्हायरल
इंग्लंड दौऱ्यातील पाच पराक्रम, जे टीम इंडियाला बनवतील टी-२० वर्ल्ड कप चॅम्पियन