इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे झाला. या सामन्यातील पहिल्या दोन दिवस इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२७ ऑगस्ट) इंग्लंड संघाने भारतीय संघावर ३५४ धावांची आघाडी घेतली होती. परंतु, भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, चौथ्या दिवशी भारताला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवशी एकही धाव न करता माघारी परतला. यासह त्याच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंड संघाने ३५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. दरम्यान, दुसऱ्या डावात केएल राहुल देखील अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला होता. त्यानंतर रोहित शर्मा देखील ५९ धावा करत माघारी परतला होता.
पण, नंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या दोघांनी मिळून इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. तिसऱ्या दिवस अखेर चेतेश्वर पुजारा नाबाद ९१ तर विराट कोहली नाबाद ४५ धावांवर माघारी परतले होते.
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला (२८ ऑगस्ट) चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल अशी आशा व्यक्त केली गेली होती. परंतु, तो असे करू शकला नाही. तो ९१ धावांमध्ये एकही धाव न जोडता माघारी परतला. यासह तो सहाव्या वेळेस दिवसाखेरच्या धावसंख्येत पुढच्या दिवशी एकही धाव न जोडता बाद झाला आहे.
या नको असलेल्या विक्रमाच्या यादीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. द्रविड ५ वेळेस दिवसाखेर केलेल्या धावांमध्ये पुढच्या दिवशी एकही धाव न जोडता बाद झाला आहे. असा नकोसा विक्रम विजय हजारे, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने यांनी प्रत्येकी ४ वेळेस केला आहे.(Cheteshwar pujara got out 6th time without adding single runs in overnight score)
तसेच पुजारा हा असा पहिलाच भारतीय फलंदाज आहे, जो दिवसाखेरच्या धावसंख्येत पुढच्या दिवशी एकही धाव न जोडता नव्वदीत बाद झाला आहे. यापूर्वी ९० ते ९९ धावांमध्ये दिवसाखेर नाबाद राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकही धाव न जोडता एकदाही भारतीय फलंदाज बाद झाला नव्हता.
भारताचा पराभव
या सामन्यात भारताचा पहिला डाव केवळ ७८ धावांवर संपुष्टात आला होता. या डावात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक १९ धावा केल्या होत्या, तर अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी ३ विकेट्स, तर सॅम करन आणि ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने १२१ धावांची शतकी खेळी केली; तर रॉरी बर्न्स (६१) आणि हसीब हमीद (६८) यांनी अर्धशतके झळकावली. त्यामुळे इंग्लंडने ४३२ धावांचा डोंगर उभा करत ३५४ धावांची आघाडी मिळवली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजायांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
यानंतर दुसऱ्या डावाची भारताने चांगली सुरुवात केली होती. रोहित शर्मा (५९), विराट कोहली (५५) आणि चेतेश्वर पुजारा (९१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, पुजारा आणि विराट बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली आणि भारताचा हा डाव ९९.३ षटकात २७८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ७६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या डावात इंग्लंडकडून ऑली रॉबिन्ससने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर क्रेग ओव्हरटनने ३ आणि मोईन अली व जेम्स अँडरसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
रसेलने पाकिस्तानी गोलंदाजाला अक्षरश: रडवलं, एका षटकात ४ सिक्ससह चोपल्या ३२ धावा
आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार
मन मे लड्डू फुटा! ड्वेन ब्रावोच्या सीपीएलमधील ‘अशा’ प्रदर्शनानंतर चेन्नई सुपर किंग्ज खूश