भारतीय कसोटी संघाचा ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे चेतेश्वर पुजारा. याच पुजाराने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक ५२१ धावा केल्या होत्या. परंतु भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो संघर्ष करताना दिसत आहे. त्यातही ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने पुजाराला तब्बल तीन वेळा बाद केले आहे. त्यामुळे माजी भारतीय गोलंदाज झहीर खानने चिंता व्यक्त केली आहे.
“पुजाराचे कमिन्सच्या गोलंदाजीपुढे संघर्ष करणे चिंताजनक”
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना झहीर म्हणाला की, “पुजाराचे कमिन्सच्या गोलंदाजीपुढे संघर्ष करणे हा चिंतेचा विषय आहे. पण पुजाराचा खराब फॉर्म हा अगदी ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टिव्ह स्मिथसारखा आहे. स्मिथदेखील आतापर्यंत भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विशेष कामगिरी करू शकलेला नाही. पण त्याला विश्वास आहे की, तो एका दिवशी त्याच्या लयीत परत येईल. पुजाराचेही अगदी असेच आहे.”
“पुजाराला त्याच्या खराब फॉर्मचे समाधान शोधावे लागणार आहे. कारण यापुर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही त्याच्यावर अशीच वेळ आली होती. पण त्याने आपल्या खराब फॉर्मवर मात करत तीन शतके लगावली होती,” असे पुढे बोलताना झहीर म्हणाला.
कमिन्सने दोन सामन्यात तीन वेळा केलय पुजाराला बाद
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजमध्ये आतापर्यंत दोन सामने पार पडले आहेत. ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पुजाराने ४३ धावा केल्या होत्या. ही त्याची या कसोटी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्यानंतर पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात कमिन्सने त्याला भोपळाही फोडू दिला नव्हता. तर बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दोन्ही डावात कमिन्सने पुजाराची विकेट काढली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रमवारीत कोहली, स्मिथवर वरचढ ठरूनही विलियम्सनला नाही गर्व, म्हणाला…
आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ‘हे’ ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश
सिडनी कसोटी जिंकायची, तर टीम इंडियातील ‘या’ तीन खेळाडूंना कराव्या लागतील सुधारणा