भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2 -1 ने विजय मिळवला आहे. भारताच्या या यशात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. पुजाराने ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आपल्या शरीरावर अनेक जखमा घेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला.
पुजाराच्या या अविश्वसनीय खेळीबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून त्याचे कौतुक केले जात आहे. अशातच चेतेश्वर पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून ते मुलाच्या कामगिरीवर खुश आहेत.
अरविंद पुजारा म्हणाले, “फलंदाजी करताना चेतेश्वरच्या बोटाला व हेल्मेटला चेंडू लागल्याने निश्चितच आम्हाला चिंता वाटत होती. मात्र काही वेळानंतरच त्याने फलंदाजी करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला बरे वाटले.” अरविंद पुजारा यांच्यामते चेतेश्वर हा भारतीय संघाच्या फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे.
पुजाराच्या वडिलांच्या मते त्याने आपल्या बॅकफुट खेळावर अधिक मेहनत करणे गरजेचे आहे. ते म्हणाले ,”चेतेश्वरला आपल्या बॅकफूटवरच्या खेळावर मेहनत घेणे गरजेचे आहे. इंग्लंड विरुद्ध आगामी मालिकेत त्याला यावर मेहनत घ्यावीच लागेल.”
दरम्यान चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी शानदार अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे पुजाराने तब्बल 211 चेंडू खेळून काढत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. पुजाराच्या या जिगरबाज खेळीमुळेच शुबमन गिल व रिषभ पंत यांना आक्रमक खेळी करण्याची संधी मिळाली व भारतीय संघ इतिहास रचत सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या आठवणीत हार्दिक पंड्याने झाला भावूक, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडिओ
एक पाय काम करत नसतानाही देशासाठी तो दिड सत्र मैदानात लढत होता
भारत माता की जय घोषणा देत गावकऱ्यांकडून शार्दुल ठाकुरचं उत्साहात स्वागत, बघा व्हिडिओ