---Advertisement---

पहिल्याच षटकात पंचांनी आऊट देताच रोहितने दिली अशी काही रिऍक्शन की चाहत्यांकडून पडला प्रतिक्रियांचा पाऊस

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 12:52 AM
---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १७ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध ९ विकेट्सने विजय मिळवला. पंजाबसाठी हा या हंगामातील दुसरा विजय ठरला. या सामन्यात जरी पंजाबने विजय मिळवला असला तरी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत केलेल्या अर्धशतकाचीही चर्चा बरीच झाली. विशेष म्हणजे या खेळी दरम्यान त्याला पहिल्याच षटकात जीवदान मिळाले होते. या घटनेबद्दल बऱ्याच चाहत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या.

नक्की काय झाले होते?

या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे या आमंत्रणाचा स्विकार करत मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी आले. पण पहिल्याच षटकात मुंबईला मोठा धक्का बसता बसता राहिला.

त्याचे झाले असे की पहिल्या षटकात पंजाबकडून मोझेस हेन्रिक्स गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर रोहितने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या जवळून यष्टीरक्षक केएल राहुलकडे गेला. राहुलने चूक न करता झेल घेतला. त्यावर पंजाबने रोहित बाद असल्याचे अपील केले.

त्यावर पंच चेट्टीथो़डी शमशुद्दीन यांनी रोहिल बाद असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय पाहून आश्चर्यचकीत झालेल्या रोहितने लगेचच डीआरएसची मागणी केली. त्याचबरोबर त्यावेळी डी कॉकजवळ येऊन तो पंचांवर वैतागून काही तरी बोलताना दिसला. त्याच्या या वैतागलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्सही केल्या.

तसेच नंतर रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू रोहितच्या बॅटला किंवा हाताला लागला नव्हता, तर त्याच्या जर्सीला लागून गेला होता. त्यामुळे शमशुद्दीन यांना त्यांचा निर्णय रद्द करुन रोहितला नाबाद घोषित करावे लागले. रोहितनेही या जीवदानाचा पूर्णपणे उपयोग करत ४० वे आयपीएल अर्धशतक झळकावले.

मुंबईचा पराभव

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या होत्या. मुंबईकडून रोहितने ५२ चेंडूत सर्वाधिक ६३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच सुर्यकुमारने ३३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त केवळ पोलार्डने नाबाद १६ धावा करत दोन आकडी धावसंख्या पार केली. या तिघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर दीपक हूडा आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर प्रतिउत्तरादाखल १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल आणि मयंक अगरवालने ५३ धावांची सलामी देत पंजाबला चांगली सुरुवात दिली. पण अगरवाल २५ धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर केएल राहुल आणि ख्रिस गेलने नाबाद ७९ धावांची भागीदारी करत पंजाबच्या विजयावर १८ व्या षटकात शिक्कमोर्तब केला. केएल राहुलने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद ६० धावा केल्या. तसेच ख्रिस गेलने ३५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

भारतीय महिला बॉक्सर्सची ऐतिहासिक कामगिरी, जिंकले सात सुवर्ण; नागपूरच्या अल्फियाचा समावेश

देवदत्त पडीक्कलसाठी लाल रंगाची जर्सी ठरतीये लकी? वाचा काय आहे नक्की कनेक्शन

चक्क मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरने मानले विराट कोहलीचे आभार, ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---