पुणे। ‘चांगले करियर, चांगले आरोग्य आणि चांगल्या देशकार्यासाठी बळकट शरीर असणे महत्वाचे आहे. युवकांनी म्हणूनच उत्तम आरोग्य आणि सुदृढतेसाठी जिम सारख्या आधुनिक सुविधांचा अंगीकार करावा’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला .
बिबवेवाडी येथे रविवारी दुपारी ‘ग्रॅव्हिटी ग्रुप ‘च्या जिमचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम, ‘ग्रॅव्हिटी ग्रुप’ चे मिहीर कुलकर्णी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि उज्वल निकम यांचा सत्कार मिहीर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
क्रीडा क्षेत्रातील दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हीटी फीटनेस क्लबने दत्तक घेऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. या खेळाडूंच्या करियरला त्यामुळे एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन हा एक हृदयस्पर्शी उपक्रम असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
ग्रॅव्हिटी फीटनेस क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील 21 दिव्यांग व्यक्ती दत्तक घेण्यात आल्या असून त्यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, चांगले शरीर व चांगले मन ईश्वराला आवडते, तसेच मातृभूमीलाही चांगले मन व चांगले शरीर असलेली तरुणाई आवडते. ग्रॅव्हिटी क्लबने दिव्यांगाना आवश्यक सुविधांनी परिपूर्ण असलेला क्लब खुला केला असून त्याचा फायदा होईल आणि नवीन खेळाडूंची टीम तयार होईल.’
उज्ज्वल निकम यांनी ग्रॅव्हिटी क्लब आणि त्यांचे प्रमुख मिहीर कुलकर्णी यांचे कौतुक केले. समाजासाठी काहीतरी करावे ही भावना कुलकर्णी यांनी जपली आहे. शारिरीक स्वास्थ्य उत्तम असेल तर मानसिक स्वास्थ्य उत्तम असते. सुदृढ शरीर असलेल्या मनात सकारात्मक विचार येतात. आजही मी कोठेही असलो तरी एक तास व्यायाम करतो, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
मिहिर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, इंडियन बॉडी बिल्डींग अॅण्ड फीटनेस असोसिएशनचे संजय मोरे यांची यावेळी शुभेच्छापर भाषणे झाली.
कार्यक्रमात योगेश मेहेर, प्रतीक मोहिते, सुनील मुलाह, अक्षय शेजवळ, सूर्यकांत दुगावले, जय भवर, अमोल कचरे, नवनाथ भोगडे, प्रियंका कुदळे, रवी वाघ या दिव्यांग खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.दिव्यांग युवकांनी बॉडि बिल्डींगची प्रात्यक्षिके दाखवून वाहवा मिळवली. ‘ग्रॅ्व्हिटी ग्रुप ‘तर्फे २४ तास जिम नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. दिव्यांग व्यक्ती देखील या जिंमचा वापर करू शकतील अशी माहिती ग्रव्हिटी जिमचे सर्वेसर्वा मिहीर कुलकर्णी यांनी बोलताना दिली.