-आदित्य गुंड
नव्वदच्या दशकात राजकोटच्या रेल्वे कॉलनीत दोन क्रिकेटवेडे मित्र एकत्र सराव करत. सरावात एकजण दुसऱ्यापेक्षा जास्त चांगला कसा खेळेल अशी त्यांची चढाओढ असे. आपण दोघे पुढे मोठे क्रिकेटपटू बनू, आपल्या संघाच्या फलंदाजीचा कणा असू, आपल्या संघाला रणजी करंडक जिंकून देऊ असे स्वप्न कदाचित त्यांनी पाहिले असावे. परवा त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले. त्यांच्या संघाने रणजी करंडक जिंकला. तो संघ म्हणजे सौराष्ट्र आणि ते क्रिकेटपटू म्हणजे ‘बचपन के यार’ अर्पित वसावडा आणि चेतेश्वर पुजारा. परवाच्या रणजी अंतिम सामन्यात या दोघांनी केलेली १४२ धावांची भागीदारी सौराष्ट्राला विजय मिळवून देण्यात निर्णायक ठरली.
लहानपणी हे दोघे मित्र पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांच्याकडे सराव करत. दोघा मित्रांच्या गुणवत्तेवर विश्वास असलेले अरविंद तेव्हापासून, “राजकोटच्या बाहेर तुम्ही खेळलात तरच तुमच्या या गुणवत्तेला काही अर्थ आहे.” असे त्यांच्या मनावर बिंबवत आले. पुजाराने काय काय साध्य केले याची उजळणी करण्यात अर्थ नाही. मात्र त्याचा मित्र अर्पित या अंतिम फेरीच्या निमित्ताने प्रकाशझोतात आला. अर्पितने २०१९-२० च्या रणजी हंगामात १० सामन्यांत ५४.५० च्या सरासरीने ७६३ धावा केल्या. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. या चारपैकी दोन शतके त्याने उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत केली. रणजीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक करण्याची कामगिरी याआधी दिनेश कार्तिकने २०१४-१५ च्या हंगामात केली होती. विशेष म्हणजे अर्पित उपांत्य आणि अंतिम सामन्यात सामन्याचा मानकरीसुद्धा ठरला. पुजारानेसुद्धा ६ सामन्यांत एका शतकासह ५७५ धावा केल्या.
अंतिम सामन्याच्या दोन दिवस अगोदर अर्पितला भरपूर ताप होता तर चेतेश्वरला घशाचा त्रास होता. आजारी पडतानाही हे दोघे मित्र एकत्रच आजारी पडले हेही विशेषच म्हणावे लागेल. त्या दोघांनी संघाच्या सरावातही भाग घेतला नाही. सौराष्ट्र संघ व्यवस्थापनाने वेळ पडलीच तर या दोघांच्य जागी इतर कुणाला तरी खेळविण्याची तयारी केली होती. मात्र ऐन वेळी दोघेही तंदुरुस्त झाले.
सौराष्ट्राची सुरुवात चांगली झाली तरी तीस धावांच्या अंतराने दोन बळी गेल्याने अर्पित आणि चेतेश्वरला पहिल्याच दिवशी फलंदाजीस यावे लागले. अर्पितने सुरुवातीला विश्वराज जडेजाबरोबर चांगली भागीदारी केली होती. जडेजा बाद झाल्यावर चेतेश्वरच्या साथीने त्याने किल्ला लढवायला सुरुवात केली. दिवसाच्या अखेरीस चेतेश्वरचे घशाचे दुखणे परत उफाळून आल्याने तो निवृत्त झाला. त्याच्या जागी आलेला चेतन सकारिया दिवसाचा खेळ संपताना बाद झाला. पहिल्या दिवसाखेर पाच बळी गेले तरी अर्पित आणि चेतेश्वर मैदानावर असल्याने सौराष्ट्र संघ व्यवस्थापन निर्धास्त होते. मात्र समोर बंगालसारखा बलाढ्य संघ असताना सौराष्ट्राला मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे होते. दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा सौराष्ट्राची धावसंख्या होती ५ बाद २०५. बंगालला एक दोन बळी झटपट मिळवत सौराष्ट्राला ३०० धावांच्या आत रोखायचे होते. तर सौराष्ट्राच्या कुठल्याही परिस्थितीत सकाळच्या सत्रात बळी गमवायचे नव्हते. अर्पित आणि चेतेश्वरने नेमके हेच केले. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या १५ षटकांत या दोघांनी फक्त २५ धावा काढल्या यावरून त्यांचा बचाव लक्षात यावा. त्या दोघांच्या अभेद्य बचावाने बंगालच्या गोलंदाजांना घाम गाळण्यास भाग पाडले. चेतेश्वरने आजवरचा आपला आंतराष्ट्रीय अनुभव पणाला लावला. अर्पितकडून एखादी बारीकशी चूक झाली तरी तो त्याला दटावत होता. सावकाश खेळ, विकेट फेकू नकोस असे सल्ले देत होता. ज्या बंगालच्या गोलंदाजांनी या हंगामात एकाही संघाला २५० हुन अधिक धावा करू दिल्या नाहीत त्याच बंगालविरुद्ध सौराष्ट्राने ४२५ धावा काढल्या. सौराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी एकूण १००० चेंडूंपैकी ५२४ चेंडू या दोघांनी खेळून काढले यावरून या दोघांनी किती टिच्चून फलदांजी केली हे लक्षात यावे.
दरम्यान अर्पितचे शतक पूर्ण झाले. अंतिम सामन्यात आपल्या संघाला अडणचणीतून बाहेर काढत शतक साजरे केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. अर्पित शतकाचा आनंद साजरा करत असताना हा त्याचा क्षण आहे, त्याला त्याचा आनंद घेऊ देत असा विचार करून आपल्या लाडक्या मित्राला अलिंगन देण्यासाठी धावत निघालेला चेतेश्वर त्याच्याकडे बघून जागीच थांबला. अर्पित भानावर आल्यावर मग त्याला चेतेश्वरने अलिंगन दिले.
शतक पूर्ण केल्यावर लगेचच अर्पित बाद झाला. दहा धावांच्या अंतराने चेतेश्वरसुद्धा बाद झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सौराष्ट्राला पहिल्या रणजी विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवल्याचे समाधान या दोन मित्रांना होते.