गेलने आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे जगभर टी20 लीगमध्ये आपला ठसा उमटविला आहे. आगामी आयपीएल दरम्यान क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात आणखी एक विक्रम नोंदवू शकतो.
तो असा विक्रम साध्य करू शकतो, जो नजीकच्या काळात तुटेल असे वाटत नाही.
फक्त 22 षटकार दूर आहे गेल
आयपीएलमध्ये सर्वाधिक 326 षटकार ठोकणार्या गेलने आतापर्यंत टी20 क्रिकेट प्रकारामध्ये 978 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे 1000 षटकारांचा जादुई क्रमांकाला स्पर्श करण्यासाठी त्याला केवळ 22 षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे तो यंदा आयपीएलमध्ये 1000 षटकार पूर्ण करू शकतो. आयपीएलमध्ये गेल आत्तापर्यंत 11 हंगामामध्ये खेळला आहे आणि त्यापैकी सहा वेळा 22 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.
सर्वाधिक चौकार देखील गेलच्याच नावे
टी20 मध्ये सर्वाधिक चौकार (1026) लावण्याचा विक्रमही गेलच्या नावावर आहे. तो वैयक्तिक कारणास्तव कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये खेळला नाही परंतु आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्याकडून खेळताना त्याने गेल्या वर्षी 34 षटकार आणि 2018 मध्ये 27 षटकार ठोकले होते.
4 वेळा ठोकले सर्वाधिक षटकार
गेल आयपीएलच्या चार स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. 2011 (44 षटकार), 2012 (59), 2013 (51) आणि 2015 (38) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) कडून खेळताना त्याने हा विक्रम केला. येत्या आयपीएल दरम्यान तो आपला 41 वा वाढदिवस 21 सप्टेंबर रोजी साजरा करणार आहे.
पुणे वॉरियर्सला काढले होते ठोकून
2013 मध्ये आरसीबीसाठी पुणे वॉरियर्सविरूद्ध नाबाद 175 धावांच्या विक्रमी खेळीत गेलने 17 षटकार ठोकले होते. आयपीएलमध्ये हा विक्रम आहे.
दुसर्या क्रमांकावर डिव्हिलियर्स
आयपीएलमध्ये गेलनंतर सर्वाधिक षटकार ठोकणार्या फलंदाजांमध्ये एबी डिव्हिलियर्स (212) आणि महेंद्रसिंग धोनी (209) आहेत.
एकूण टी२० क्रिकेट प्रकारामध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये गेलच्या पश्चात वेस्ट इंडीजचा कायरान पोलार्ड (672) आहे. पण तो त्याच्यापेक्षा खूप मागे आहे. रोहित शर्माच्या नावावर 361 षटकार आहेत.
टी20 मध्ये सर्वाधिक धावा
इतकेच नव्हे तर टी -20 मध्ये सर्वाधिक धावा (13,296), सर्वाधिक शतके (22), सर्वाधिक अर्धशतक (82), डावातील सर्वाधिक धावा (नाबाद 175), जलद शतक (30 चेंडू), पराभूत संघासाठी सामन्यात सर्वाधिक धावा (नाबाद 154). कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक धावा (2015 मध्ये 1665), सामनावीर (58) आणि एकाच डावात चौकार-षटकारांद्वारे (154 वि. पुणे वॉरियर्स) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्याच नावावर आहे.
हा नको असलेला विक्रमही होऊ शकतो नावावर
आयपीएलदरम्यान तो असा विक्रमही करू शकतो ज्याची त्याला कधी जवळ जाण्याची इच्छा नव्हती. टी20 मध्ये खाते उघडता न येण्याची ही नोंद आहे, म्हणजेच शून्यावर बाद होणे.
गेल आतापर्यंत टी20 मध्ये 27 वेळा खाते उघडण्यात अपयशी ठरला आहे आणि टी२०मध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याच्या यादीत तो पाकिस्तानच्या उमर अकमलबरोबर संयुक्तपणे दुसर्या क्रमांकावर आहे. प्रथम स्थानावर वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथ (28) आहे.
शून्यावर बाद न होण्याचाही विक्रम
विशेष म्हणजे टी20 मध्ये शून्यावर बाद न होता सर्वाधिक डाव (145) खेळण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे. हा विक्रम 10 फेब्रुवारी 2012 ते 5 फेब्रुवारी 2016 दरम्यान झाला होता.