---Advertisement---

युवा सलामीवीरांवर युनिव्हर्स बॉसचा गंभीर आरोप; म्हणाला…

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 12:11 AM
---Advertisement---

अबूधाबी येथे टी१० लीगचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी झालेला वेस्ट इंडिजचा महान स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने सध्याच्या सलामीवीरांवर निशाणा साधला आहे. गेलने म्हटले आहे की, सध्याचे सलामीवीर टी२० क्रिकेटमधील मनोरंजन नष्ट करत आहेत कारण ते अतिशय संथ गतीने फलंदाजी करतात. यामुळे चाहत्यांना त्याचा फारसा आनंद मिळत नाही.

गेलच्या म्हणण्यानुसार, टी२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात खूप आक्रमक फलंदाजी असायची. मात्र, काळाच्या ओघात ती मंदावली आहे. या प्रकरणी गेलने टी१० ला चांगले म्हटले आणि सांगितले की, या लीगमध्ये फलंदाज पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात करतात.

अबूधाबी येथे टी१० लीगमध्ये सहभागी झालेल्या गेलने एका निवेदनात म्हटले की, “ज्या पद्धतीने टी१० क्रिकेट खेळले जात आहे. त्याच पद्धतीने टी२० क्रिकेटची सुरुवात झाली होती. आधी टी२० मध्ये पहिल्याच षटकापासून फलंदाज आक्रमक खेळी खेळायला सुरुवात करायचे. पण, हळूहळू त्यांचा खेळ संथ होत गेला. आता टी१० क्रिकेटचा दर्जा खूप उंचावला आहे. सध्याचे सलामीवीर टी-२० क्रिकेटचे मनोरंजन नष्ट करत आहेत.”

गेल पुढे म्हणाला, “सलामीवीर पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करू शकतात. परंतु, ते सेट होण्यासाठी त्यांचा खूप वेळ घेतात. काहीवेळा ते फक्त धावा काढण्यासाठी खेळतात आणि पहिल्या सहा षटकांमध्ये त्यांना आवश्यक असलेली सुरुवात मिळत नाही. मात्र, टी१० मध्ये पहिल्याच चेंडूपासून आक्रमणाला सुरुवात होते. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होते. आगामी काळात अशा आणखी स्पर्धा आयोजित केल्या जातील अशी अपेक्षा आहे.”

ख्रिस गेलच्या मते, पहिल्या सहा षटकांमध्ये फलंदाज इतके संथ का होतात हे त्याला समजत नाही. टी२० क्रिकेट सुरू झाले तेव्हा पहिल्याच चेंडूपासून खेळाडू चौकार-षटकार मारायचे.

ख्रिस गेल हा टी२० चा महान खेळाडू मानला जातो पण टी२० विश्वचषक स्पर्धेत हा दिग्गज पूर्णपणे फ्लॉप ठरला. गेलच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघालाही फटका बसला आहे. या विश्वचषकात गेलने आपल्या संघासाठी सर्व सामने खेळले आणि ५ सामन्यात त्याने केवळ ४५ धावा केल्या. गेलने गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर २७ डावांत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. टी२० विश्वचषकाच्या संघात त्याच्या निवडीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याआधीही ख्रिस गेलने आयपीएलमध्ये खराब प्रदर्शन केले होते. त्यानंतर टी२० विश्वचषकातही तो फ्लॉप ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---