वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज आणि युनिव्हर्स बाॅस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल(Chris Gayle) पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पुढील हंगामात नव्या भुमीकेत दिसणार आहे. त्याने पीएसएलमध्ये संघाचा प्रशिक्षक बनायचे असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने त्याच्या ट्वीटर आकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे की, पुढील हंगामात तो कराची किंग्स संघाचा मुख्य प्रशिशक्षक असेल आणि त्याला या गोष्टीवर कोणताही वाद नको आहे.
२०२२ च्या हंगामात कराची किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली. संघाला या हंगामात फक्त एकच सामना जिंकता आला तर सलग ८ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कराची संघाने लाहोर कलंदर्स संघाविरुद्ध एकच विजय मिळवला आहे. या संघाचे नेतृत्व पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम करत आहे. त्यातच आता ख्रिस गेलच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे.
४२ वर्षीय गेलने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “हॅलो पीएसएल, पुढच्या हंगामात मी कराची किंग्सचा नवा प्रशिक्षक असेल. यावर कोणताही वाद नको.” यामध्ये त्याने कराची फ्रॅंचायझीलाही टॅग केले आहे. तसेच हॅशटॅग देत युनिव्हर्स बाॅस असे लिहिले आहे.
ख्रिस गेलने टी२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. तेव्हा तो म्हणाला होता की, त्याला आणखीन एक विश्वचषक खेळायला आवडेल परंतु त्याला परवानगी मिळाली नाही. मागील वर्षापर्यंत गेल पीएसएलमध्ये खेळत होता. तो पीएसएलमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्स, लाहोर कलंदर आणि कराची किंग्स या संघांकडून खेळला आहे.
यावर्षी बीसीसीआयने गेलला आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये स्थान दिले नाही. त्यामुळे कोणतेही फ्रॅंचायझी त्याच्यावर बोली लावू शकली नाही. तो आयपीएलमध्ये आत्तापर्यंत केकेआर, आरसीबी, पंजाब या संघाकडून खेळला आहे. गेल्या मोसमात त्याला पंजाबने रिटेन केले नव्हते.
नुकताच पीएसएलमध्ये एक वाद पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू जेम्स फाॅकनरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आरोप केला आहे. फाॅकनरने ट्वीट करत म्हणाला की, ‘पीसीबीकडून मला निश्चित मानधन न मिळाल्यामुळे मला शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आणि पीएसएल सोडावी लागली. मी सुरुवातीपासूनच येथे आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्याशी खोटे बोलत होते’. यानंतर त्यावर पाकिस्तानच्या एका हाॅटेलमध्ये दारु पिऊन तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.