नुकताच न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी रावळपिंडी येथे खेळवला जाणार होता. पण, न्यूझीलंच्या संघाने सामन्यापूर्वी खेळण्यास नकार दिला होता. या दोन्ही संघांमध्ये लाहोर येथे पाच सामन्यांची टी -२० मालिकाही खेळवली जाणार होती. न्यूझीलंडने खेळण्यास नकार दिल्याने पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेटपटूंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलने या प्रकरणावर एक ट्विट करून समाजमाध्यमात खळबळ उडवून दिली आहे.
गेलने रविवारी १९ सप्टेंबरला त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने लिहिले की, ‘मी उद्या पाकिस्तानला जात आहे. माझ्याबरोबर कोण येणार आहे? ‘ गेलच्या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते विचारत आहेत की ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेला गेल आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळेल का नाही? त्याचवेळी, अनेकांनी म्हटले आहे की, गेल फक्त पाकिस्तानात जाण्याबद्दल विनोद करत आहे. मात्र, गेल खरोखरच पाकिस्तानला जाणार आहे की नाही किंवा त्याने नुकतेच एक खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे, याबाबत शंका आहे.
चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
एका चाहत्याने लिहिले आहे की, ‘ युनिव्हर्स बॉस आता तुमच्यासाठी आयपीएल नाही.’ आणखी एका चाहत्याने अजय देवगणच्या फुल और कांटे या चित्रपटाचे मीम शेअर केले आहे आणि म्हटले आहे की, ‘ख्रिस गेल एकाच वेळी यूएईमध्ये आयपीएल आणि पाकिस्तानला क्रिकेट खेळतांना.’ दुसरीकडे, एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिले की, ‘भाऊ, या क्षणी आम्ही खूप संवेदनशील आहोत, आशा करतो तू आमच्या सोबत अशी गंमत करणार नाहीस. त्याचवेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरनेही गेलच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. हसणारे इमोजी टाकत आमिरने लिहिले आहे की, ये इकडेच भेटू.